आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाचा विळखा हळूहळू सैल होतो न होतो तोच आता देशभरात बर्ड फ्लू हातपाय पसरत असल्याचे समोर येत आहे. ४ जानेवारीला हिमाचल प्रदेशातील पोंग धरण क्षेत्रात १७०० स्थलांतरित बार हेडेड गूज पक्षी मृतावस्थेत आढळले होते. त्यांचे नमुने तपासले असता एव्हियन इन्फ्लुएंझा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बर्ड फ्लू देशभरात हातपाय पसरतो की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात सध्या धोका नसल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. पण दक्षता घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.
पैठण येथील जायकवाडी धरण परिसरात स्थलांतरित पक्षी येण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. हिवाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात परदेशी पाहुणे पक्षी येतात. हिमाचल प्रदेशमध्ये मृत आढळलेले पट्टेरी राजहंस म्हणजेचे बार हेडेड गूजची संख्या जायकवाडीवर खूप आहे. त्यामुळे येथे जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. याबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनाही जारी झाल्या आहेत.
चार दिवसांपूर्वीच पाहणीचे आदेश; वन अधिकारी म्हणतात, आता काम सुरू करू
देशभरातून पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथील हायसेक्युरिटी अॅनिमल डिसिज लॅबोरेटरी येथे सॅम्पल पाठवले जात आहेत. हा धोका ओळखता केंद्राकडून मार्गदर्शक सूचना काढण्यात आल्या. पण पैठणमध्ये स्थानिक पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना सोबत घेऊन जायकवाडी परिसरात पाहणी करत मृत पक्षी आढळल्यास त्या संबंधीचा अहवाल पाठवण्याचे आदेश चार दिवसांपूर्वी सरकारकडून देण्यात आले. परंतु अद्याप पाहणी सुरू करण्यात आली नसून उद्यापासून यावर काम करू, असे पैठण येथील वनाधिकारी कैलास गिते यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. दुसरीकडे, नांदेडला याबाबत अजून सूचना नाहीत. पण आमच्या स्तरावर खबरदारी घेत असल्याचे नांदेडचे सहायक वन संरक्षक डी. एस. पवार यांनी म्हटले.
काय म्हणतात पक्षी अभ्यासक?
याबाबत बोलताना वन्यजीव अभ्यासक डॉ. दिलीप यार्दी म्हणाले की, जायकवाडी परिसरात बार हेडेड गुजसह स्थलांतरित पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्यातरी असा कोणता धोका वाटत नाही. पण धरणालगत गावांची संख्या जास्त असल्याने काळजी घेण्याची गरज आहे. तर, जायकवाडीवर येणाऱ्या पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा धोका नसल्याचे डॉ. किशोर पाठक म्हणाले. येथे येणाऱ्या पक्ष्याचा मुक्काम जास्त काळ असल्याने घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. नांदेड परिसरात परदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन मागील तीन वर्षांपासून प्रचंड घटले आहे. त्यामुळे आपल्याकडील पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू असण्याची शक्यता नाही, असे मानद वन्यजीव रक्षक तथा पक्षी अभ्यासक अतिंद्र कट्टी यांनी म्हटले.
औरंगाबाद परिसरातील पक्षी
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण येथील जायकवाडी धरण परिसर, सुखना, सलीम अली, वाळूजजवळ टेंभापुरी प्रकल्पावर ३० ते ३५ प्रकारचे पक्षी येतात. यात बदकांत चक्रवाक, थापट्या, मलिन, भुवई, पट्टेरी हंस (बार हेडेड गूज) आदी बदक त्यानंतर पान टिवळे, तुतारी, पानलावे, माळ भिंगऱ्या, कृष्ण क्रौंच, तरंग बदक आदी पक्षी आढळतात.
महाराष्ट्रात सध्या बर्ड फ्लूचा संसर्ग अाढळून अाला नसल्याचे राज्य सरकारचे स्पष्टीकरण; केंद्राच्या मार्गदर्शक सूचनाही जारी
नांदेडमध्ये आढळणारे स्थलांतरित पाहुणे
नांदेडमध्ये काही वर्षांपूर्वी धोबी, तुतवार, चक्रवाक, तलवार, चकरांग, पळस मैना, तरंग, माळ भिंगरी, गुलाबी चिमणी, नीलकंठ आदी पक्षी मोठ्या संख्येने आढळून येत होते. पण वाढती मासेमारी, प्रदूषित पाणी, अन्नाची कमतरता यामुळे तीन वर्षांपासून या पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.