आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तत्कालीन सहायक संरक्षकासह 8 जणांवर गुन्हा:रस्ता रुंदीकरणामध्ये तोडलेल्या झाडांच्या वाहतुकीत झाला घोटाळा

छत्रपती संभाजीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाच वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर-जळगाव रस्त्याच्या रुंदीकरणात बाधित वृक्षांची तोड करण्यापासून त्याची विक्री व वाहतुकीत मोठा घोटाळा झाल्याचा प्रकार आता समोर आला आहे. विभागाच्या अंतर्गत चौकशीत हा प्रकार समोर येऊनही कारवाई न झाल्याने मनोज कापुरे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशावरून या प्रकरणी तत्कालीन सहायक वनसंरक्षक अर्जुन महादेव सोनवणे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील सात लाकूड व्यावसायिकांवर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कापुरे स्वत: वन विभागात काम करतात. सोनवणे व इतरांचा घोटाळा समोर येऊनही कारवाई न झाल्याने त्यांनी याचिका दाखल केली हाेती. त्यानुसार, छत्रपती संभाजीनगर-जळगाव रस्त्याच्या रुंदीकरणात बाधित वृक्षांची तोडणी, विक्री व वाहतुकीचे काम झारखंडच्या ऋत्विक लॅन्को जाॅइंट व्हेंचरला देण्यात आले होते. त्यांनी पुढे हे काम चांदवडच्या उत्तम बाबूराव बच्छाव यांच्या जय बाबाजी फायर वूड सप्लायर्स कंपनीला दिले. त्यांनी भागीदार म्हणून सहा पार्टनर सोबत घेतले. परंतु या सर्व कामासाठी वन विभागाचा वृक्षतोड परवाना, विक्रीचा संतुक आदेश व लाकूड वाहतूक करण्याचा आदेश काढणे बंधनकारक होते.

अधिकारी सोनवणे यांनी सुटीच्या दिवशी संतुक आदेश व परवाना आदेश जारी केला. ३० ऑक्टोबर पहाटे तीन वाजता वैजापूर पोलिसांनी लाकडे वाहून नेणारे वाहन थांबवले असता परवाना सादर करण्यात आला. परवान्यावर २९ ऑक्टोबर तारीख होती. त्या दिवशी रविवार होता. प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता दिसताच आरोपींनी आदेशात खाडाखोड करून ती ३० ऑक्टोबर केली. सर्वांनी मिळून हे केल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी सोनवणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मात्र, त्यानंतर कारवाई झाली नाही. आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला. मात्र, न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारल्याचे देखील एफआयआरमध्ये म्हटले आहे.

यांच्यावर गुन्हा झाला दाखल न्यायालयाच्या आदेशावरून पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी बच्छाव, सोनवणेंसह लतीफ फत्तू सय्यद ( रा. कोपरगाव, अहमदनगर), संतोष शंकर पैठणकर, सुरेश गोविंद शिंदे, सत्तार शहा गुलजार शहा (, सर्व रा. येवला), जाकीर रशीद शेख , आसिफ रशीद शेख ( दोघेही रा. नगरसाेल) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केली.

बातम्या आणखी आहेत...