आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडगा:नायलॉन मांजा कापण्यासाठी 3 जिल्ह्यांत असतील 68 पथके, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत पोलिस करणार कारवाई

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मकरसंक्रांतीनिमित्त पतंगोत्सव जल्लोषात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी पतंग काटाकाटीच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. एकमेकांच्या पतंग कापण्यासाठी मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा वापर केला जातो. पतंग उडवण्याच्या आनंदापेक्षा रस्त्यावरून जाणारे वाटसरू, दुचाकी वाहन चालक मांजामुळे गंभीररीत्या जखमी होण्याचे प्रकार वाढले आहेत. याशिवाय पक्ष्यांनाही या मांजापासून धोका निर्माण होत असल्याचे प्रकार झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी यंदा कारवाईची मोहीम अधिक तीव्र करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात तब्बल ६८ पथके नेमली असून नायलॉन, प्लास्टिक अन् सिंथेटिक मांजाचा पुरवठा किंवा विक्री केल्यास कारवाईचा इशारा पोलिस विभागाने दिला आहे.

हिंगोली शहरासह जिल्ह्यात पतंग व मांजा विक्री सुरू झाली आहे. या पतंग व मांजा विक्रीतून सुमारे पंधरा दिवसांत किमान एक कोटी रुपयांपेेक्षा अधिक रकमेची उलाढाल होते. वृद्धांपासून ते बच्चे कंपनीपर्यंत सर्वजण मकर संक्रांती निमित्त पतंग उडवण्याचा आनंद लुटतात. मात्र हा आनंद इतरांसाठी दुःखात बदलू नये यासाठी नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कारवाईचा निर्णय झाला.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे सोपवली कारवाईची जबाबदारी { मांजा खरेदी, विक्री आणि साठा करणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी नांदेडचे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे ३६ पोलिस ठाण्यांत पथके स्थापन { स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर सर्व पथकांचे प्रमुख म्हणून काम पाहणार { नायलॉन मांजाचा पुरवठा व विक्री करताना कोणी आढळल्यास ९८२२४५८४११ या मोबाइल क्रमांकावर माहिती द्यावी { हिंगोलीत पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी १३ पोलिस ठाण्यांतर्गत अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी केले जाहीर { नायलॉन मांजा विक्री व पुरवठा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या हिंगोलीतील सर्व ठाणेदारांना दिल्या सूचना { परभणीत १९ पोलिस ठाण्यांत कारवाईसाठी पथकांची केली नियुक्ती { परभणी जिल्ह्यात ११२ क्रमांक व पोलिस ठाण्यांच्या प्रभारींचा क्रमांक केला जाहीर

दिव्य मराठी आवाहन : नायलॉन मांजाचा वापर करत पतंगोत्सव साजरा करताना मानव व पक्ष्यांसाठी तो घातक ठरतो आहे. गेल्या वर्षीही दुचाकी वाहन चालवताना तसेच पतंग उडवताना मांजामुळे राज्यातील विविध भागात अनेकांचा बळी गेला. पक्षीही दगावले. त्यामुळे मांजा न वापरता मकरसंक्रांतीला पतंगोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन ‘दिव्य मराठी’च्या वतीने करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...