आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तकातच आता वह्यांची पाने:तिसरी ते दहावीच्या पुस्तकांत होणार बदल; प्रत्येक घटकानंतर ‘माझी नोंद’ अशी कोरी पाने

छत्रपती संभाजीनगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाठ्यपुस्तके व वह्यांचे वाढते ओझे कमी करण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जूनपासून (२०२३-२४) सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात पाठ्यपुस्तकातच वह्यांची कोरी पाने समाविष्ट करण्यात येणार आहेत.एकीकडे मुलांचे दप्तराचे ओझे वाढत आहे तर दुसरीकडे ग्रामीण, वंचित समूहातील मुलांना लिखाणाचे साहित्य उपलब्ध होत नाही. या दोन प्रतिकूल परिस्थितीवर उपाययोजना म्हणून पाठ्यपुस्तकातच वह्यांची पाने छापण्याचा हा निर्णय घेण्यात आल्याचे सदर शासन आदेशात म्हटले आहे.

तिसरीपासून दहावीपर्यंतची पुस्तके अशाच प्रकारे छापण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळातर्फे छापण्यात येणाऱ्या सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये हा बदल करण्यात येणार आहे. सर्व माध्यमांच्या सर्व विषयांच्या सेमी व इंग्रजी माध्यमांसह सर्व पुस्तकांमध्ये हा बदल असणार आहे. प्रत्येक पाठानंतर आवश्यकतेनुसार ‘माझी नोंद’ची एक किंवा दोन कोरी पाने पुस्तकातच कोरी ठेवण्यात येणार आहेत. त्यातच विद्यार्थ्यांनी त्या पाठाशी संबंधित लिखाण करणे अभिप्रेत असणार आहे.

अशा प्रकारे एकात्मिक स्वरूपातील पुस्तक चार भागांमध्ये असेल. पाठ्यपुस्तकातील या प्रश्नांशिवाय सराव, वर्गकार्य, गृहपाठ यांच्यासाठी स्वतंत्र ठेवण्याची मुभा असेल. काही पाठ्यपुस्तकांमधील पाठांच्या आवश्यकतेनुसार सरावाच्या पानांची संख्या बदलली जाईल. ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य विषयांची ४ भागांमध्ये विभागणी करण्यात येणार आहे, तर वैकल्पिक विषयांची स्वतंत्र पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...