आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकरी कायद्यांच्या विरोधात ३७८ दिवस चाललेले आंदोलन कोणत्याही मागणीसाठी नव्हते. सत्याग्रहाच्या बळावर शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना झुकवले. कारण ‘ज्यांच्या गळ्यात कोणताही गमछा नाही त्यांच्याच हातात हा देश आहे..’ असे पराग पाटील निर्मित, वरुण सुखराज दिग्दर्शित ‘टू मच डेमॉक्रसी’ या ९२ मिनिटांच्या माहितीपटातून सांगण्यात आले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या औरंगाबाद विभागीय केंद्रामार्फत चालवण्यात येणाऱ्या चित्रपट चावडी उपक्रमांतर्गत हा माहितीपट नुकताच दाखवला. या वेळी एमजीएमचे कुलपती तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंकुशराव कदम, सचिव नीलेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतकरी आंदोलनाबद्दल सुशिक्षितांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा माहितीपट असून तो ऐतिहासिक आंदोलनाचा दस्तऐवज आहे. शेतकरी आंदोलनाचा गाभा हा गांधी विचारधारा आहे.
आंदोलनाची सुरुवात कशी झाली, कशा पद्धतीने घटना घडत गेल्या, पंजाबच्या शेतकऱ्यांनी कायदे हाणून पाडण्यासाठी लढा किती बारकाईने उभारला होता, याचे तपशील वरुण यांनी टिपले आहेत. विशेष म्हणजे आंदोलनात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या व्यक्ती, मीडिया कव्हरेज, पोलिसांची भूमिका, राजकीय मतमतांतरे अशा विविध पैलूंना स्पर्श केला आहे. शेतकरी आंदोलनाची दुसरी बाजू समजून घेण्यासाठी ‘टू मच डेमॉक्रसी’ पाहावा असा आहे, असे मत प्रेक्षकांनी व्यक्त केले. वरुण यांनी माहितीपटाच्या निर्मितीमागील कथा सांगितली. रोटरी क्लब अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दीपक पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अस्पर्शित राहिल्या त्या महिला : आंदोलनाचा अन्वयार्थ लावताना वरुण यांनी सामाजिक, राजकीय असे विविध पैलू मांडले. पण महिलांचा मुद्दा अर्थाने दुर्लक्षित, अस्पर्शित राहिला. शेतीचा शोध महिलांनी लावला. पंजाबातील शेतकरी दिल्लीत आंदोलन करत असताना सव्वा वर्ष महिलांनीच शेती सांभाळली. त्यांचा आंदोलनातील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग दिग्दर्शक वरुण यांनी टिपला नाही ही या माहितीपटाची कमकुवत बाजू ठरते, असेही मत व्यक्त झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.