आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:मराठवाडा साहित्य पुरस्कार पोस्टाने, कोरोनामुळे पोस्टमनच्या हस्ते पुरस्कार ही पहिलीच वेळ

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विविध क्षेत्रांवर दिसून येत आहे. तसा परिणाम विविध समारंभावरही असून, साहित्य क्षेत्रावरही झाला आहे. थाटात पार पडणारा मराठवाडा साहित्य पुरस्कार यंदा कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे होवू शकला नाही. या साहित्य पुरस्काराचे मानकरी असणाऱ्या लेखकांना त्यांचे पुरस्कार यंदा मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने मानचिन्ह पोस्टाने पाठवले असून, पुरस्काराची रक्कमही ऑनलाइन पाठविण्यात आली आहे. ही पहिलीच वेळ असेल की, अशा पद्धतीने पुरस्कारांचे वितरण झाले असावे असे मत, साहित्य वर्तुळातही व्यक्त होत आहे.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या विविध वाड्मय प्रकारांतील उत्कृष्ट ग्रंथांना पुरस्कार दिले जातात. २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांतून निवड करण्यात आलेल्या ग्रंथपुरस्कारांची घोषणा मसापने जून महिन्यात केली होती. परंतु कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनची परिस्थिती यामुळे आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीकोनातून यंदा पुरस्कार वितरण समारंभ न घेता पुरस्कार विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि पुरस्काराची रक्कम चेक पोस्टाने घरपोच पाठविण्यात येईल असे मसापचे अध्यक्ष कौतिराव ठाले पाटील यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार सर्व पुरस्कार प्राप्त लेखक, कवींना त्यांच्या पुरस्काराचे मानचिन्ह पोस्टाने पाठविण्यात आले तर पुरस्काराची रक्कमही ऑनलाइन जमा करण्यात आल्याचे मसापचे कार्यवाह दादा गोरे यांनी सांगितले. यंदाच्या या पुरस्कारांमध्ये यंदा नरेंद्र मोहरीर वाड्मय पुरस्कारासाठी औरंगाबाद शहरातील डॉ.देवकर्ण मदत यांच्या "मराठवाड्यातील साहित्य आणि संशोधन ' व डॉ.बाळू दुगडूमवार यांच्या "बाबा आमटे:व्यक्तित्व, कवित्व व कर्तृत्व ' या ग्रंथांना विभागून देण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरुप पाच हजार रुपये असून हा पुरस्कार दोन वर्षातून एकदा देण्यात येतो. तर नरहर कुरुंदकर वाड्मयपुरस्कारासाठी मनोज बोरगावकर यांच्या "नदीष्ट' या कादंबरीला देण्यात आला. हा पुरस्कार फक्त मराठवाड्यातील कवी, लेखक, समीक्षकास देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप तीन हजार रुपये आहे. मराठीतील समीक्षा किंवा वैचारिक लेखनासाठी देण्यात येणारा यंदाचा प्राचार्य म.भि. चिटणीस वाड्मयपुरस्कारासाठी नागरूपरचे चंद्रकांत वानखेडे यांच्या "गांधी मरत नाही' या ग्रंथास देण्यात आला. तर कवीता लेखनासाठी देण्यात येणाऱ्या कै. कुसुमताई देशमुख काव्यपुरस्कारासाठी पैठण येथील प्राथमिक शिक्षक संदीप जगदाळे यांच्या " असो आता चाड ' या कवितासंग्रहास देण्यात आला.

बी.रघुनाथ यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या कथा/कादंबरीसाठीचा पुरस्कार बीडचे सोपन हाळमकर यांच्या "वाढण' कथासंग्रहास तर मराठी पुस्तक व्यवहारात लक्षणीय काम करणाऱ्या व्यक्तीस देण्यात येणाऱ्या रा.ज.देशमुख स्मृतिपुरस्कारासाठी पुण्याच्या संस्कृती प्रकाशनाच्या सुनीताराजे पवार यांची निवड करण्यात आला. तर मराठीतील उत्कृष्ट नाटकाला किंवा नाट्यसमीक्षेला देण्यात येणाऱ्या कुमार देशमुख नाट्य पुरस्कारसाठी नांदेडच्या जगदीश कदम यांच्या " वडगाव लाईव्ह ' आणि औरंगाबादच्या सुनंदा गोरे यांच्या कुमारांसाठी लिहिलेल्या "नवी प्रतिज्ञा' या बालनाट्यास देण्यात आला. यंदाचा हा नाट्य पुरस्कार दोघांना विभागून देण्यात आला .