आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शासनाने लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यानंतर आता प्रशासनानेही जिल्ह्यात अधिक कडक उपाय योजना हाती घेण्यास सुरवात केली आहे. यामधे हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरील चेकपोस्टवर अधिक कसून चौकशी केली जाणार आहे. चुकीचे कारण सांगून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांना आता आरोग्य विभागाने उभारलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती करून चौदा दिवसानंतरच घरी पाठवण्याच्या सुचना जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर प्रशासन चांगलेच हादरून गेले होते. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी वारंवार यंत्रणांच्या बैठका घेऊन आवश्यक त्या सुचना दिल्या आहेत. त्यानंतर मागील पंधरा दिवसांत एकही रुग्ण सापडला नाही. तर या एकमेव रुग्णाचा चौदा दिवसांचा कालावधी संपला आहे.
दरम्यान, पुढील काळातील संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किशोर श्रीवास, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी जिल्ह्याची भौगोलीक पार्श्वभुमी लक्षात घेऊन शासकिय क्वारंटाईन सेंटर सुरु केले आहेत. यामध्ये हिंगोली येथे दोन शासकिय इमारतीमध्ये प्रत्येक शंभर बेडचे दोन क्वारंटाईन सेंटर तयार केले असून वसमत, कळमनुरी व औंढा नागनाथ या ठिकाणी खाजगी इमारती ताब्यात घेऊन प्रत्येकी पंन्नास बेडचे क्वारंटाईन सेंटर तयार केले आहे. संशयीत रुग्णांना या क्वारंटाईन सेंटरमध्ये चौदा दिवस ठेवले जात आहे.
शासनाने लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यानंतर जिल्ह्यातही प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाय योजना हाती घेेतल्या जाणार आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी यंत्रणांना सुचना दिल्या आहेत. तर हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्यांची चेकपोस्टवर कसून तपासणी केली जाणार आहे. चुकीचे कारण सांगून जिल्ह्यात करू पाहणाऱ्यांना थेट आरोग्य विभागाच्या या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाणार असून चौदा दिवसानंतरच त्यांना घरी सोडले जाणार आहे. तर विनाकारण घराच्या बाहेर फिरणाऱ्यांनाही आता क्वारंटाईन केले जाणार आहे. त्यांची वाहने जप्त करून त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
या शिवाय पोलिस अधिक्षक योगेशकुमार यांनी बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. चेकपोस्टवरून हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांचे क्रमांक तसेच वाहन चालकांची नांवे नोंदवून ठेवण्याच्या सुचनाही दिल्या आहेत. चेकपोस्टवर कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी वेळेवर हजर राहण्याच्या सुचनाही पोलिस अधिक्षक योगेशकुमार यांनी दिल्याचे सुत्रांनी सांगितले.
दरम्यान, महसुल विभाग अन पोलिस विभागाने कठोर निर्णय घेण्याचे ठरविल्यामुळे आता क्षुल्लक कारणावरून हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांना थेट आरोग्य विभागाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये चौदा दिवसांचा मुक्काम ठोकावा लागणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.