आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठराविक शाळांमधील प्रवेशासाठी पालक अट्टाहास करत असल्यामुळेच आरटीई प्रवेश प्रक्रियेत जागा रिक्त राहत असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तर, प्रत्येक पालकास आपला पाल्य चांगल्या शाळेत शिकावा, अशी अपेक्षा असते. परंतु आजही बहुतांश पालकांना आरटीई योजनेची व नियमांची माहिती नसते. तसेच, कागदपत्रांची पूर्तता, मोठ्या शिक्षण संस्थांच्या मुजोरीपणामुळे अनेक पाल्य चांगल्या शाळेतील प्रवेशापासून वंचित राहतात, असे सामाजिक कार्यकर्ते आणि पालकांचे म्हणणे आहे.
आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास प्राथमिक शिक्षणाचा अधिकार मिळावा, यासाठी मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा करण्यात आला. गेल्या दोन वर्षापासून कोरानाच्या प्रादुर्भावामुळे आरटीईची प्रवेश प्रक्रिया आणि लकी ड्रॉ ऑनलाइन पद्धतीनेच करण्यात आली. मात्र प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याच्या उद्देशाने जानेवारी महिन्यापासून ही प्रक्रिया ऑफलाईन करण्यात आली. गेल्या पाच वर्षातील आकडेवारी पाहता मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहत असल्याचे आढळून आले आहे. तर, पालक हे नामांकित आणि ठराविक शाळांमध्ये प्रवेशाचा अट्टहास करतात. नंबर लागल्यावरही प्रवेश घेत नसल्यानेच जागा रिक्त रहात असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. यावर मात्र पालक संघ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षण विभागाद्वारे ज्या घटकासाठी ही योजना आहे. त्यांच्यापर्यंत योग्य माहिती दिली जात नसल्याने जागा रिक्त रहात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पालकांचाच अट्टहास
ठराविक शाळांमध्ये पालकांना प्रवेश घ्यायचा असतो. परंतु आरटीई प्रवेश प्रक्रियेत सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्याने त्यात कुणीही हस्तक्षेप करु शकत नाही. पालकांच्या ठराविक शाळांच्या अट्टाहासामुळे आरटीईच्या जागा रिक्त राहतात, असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले.
माहितीचा अभाव
सर्व पालकांपर्यंत अजूनही माहिती पोहचलेली नाही. नामांकित शाळाही आरटीईतून प्रवेश घेतलेल्या पालकांच्या पाल्यास वेठीस धरतात. तक्रार केल्यावर शिक्षण विभागही दखल घेत नाही. प्रक्रियाही खूप उशीरापर्यंत चालते, वेळोवेळी पालकांनाही माहिती देणे आवश्यक आहे, असे पालक प्रकाश इंगळे यांनी सांगितले.
उदासिनता दूर व्हावी
आरटीई कायदा खूप चांगला. परंतु अनेक पालकांपर्यंत अजूनही पोहचलेला नाही. त्या विषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. त्याच्या अंमलबजावणीबाबतच उदासिनता असल्यानेच जागा रिक्त राहतांना दिसतात, असे शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.
असे आहेत यंदाचे प्रवेश आणि रिक्त जागा
आरटीई पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादमध्ये ५७५ शाळा आरटीईसाठी पात्र असून, प्रवेश क्षमता ४ हजार ३०१ आहेत. यासाठी १७ हजार २२१ अर्ज आले आहेत. अजूनही २ हजार ४८४ जागा रिक्त आहेत. शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या फेरीत २७.२२ टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत. तर दुसऱ्या प्रतिक्षा यादीतील प्रवेशासाठी ४४३ पालकांना संदेश पाठविण्यात आले .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.