आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहरे कृष्णा...हरे रामा...अशा नामस्मरणात भक्तिमय वातावरणात तल्लीन होऊन कृष्णभक्त थिरकले. जागोजागी रांगोळया काढून तर फुलांची उधळण करून मोठ्या उत्साहात इस्कॉनची रथयात्रा काढण्यात आली. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच पश्चिम बंगालमधून गौर (कृष्ण), नीताई (बलराम) यांच्या मूर्ती मागवण्यात आल्या.
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघातर्फे (इस्काॅन) रविवारी इस्कॉनच्या अध्यक्षा डॉ. रोहिणीप्रिय प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली दशमेशनगर येथील महादेव मंदिरापासून रथयात्रा काढली. फुलांनी सजवलेल्या रथात विराजमान गौर, नीताई यांच्या मूर्तींचे माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर नंदकुमार घोडेले, गोपाल अग्रवाल, श्रीधर प्रियादास आदी कृष्णभक्तांची उपस्थिती होती. स्वयंचलित रथाचा दोरखंड ओढून हरे कृष्णा, हरे रामा...रामा ...रामा ..हरे ..असे भजन गात भाविक सहभागी झाले होते. रथाच्या मार्गावर २०० किलो फुलांचा वर्षाव करण्यात आला. जागोजागी रांगोळी काढण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या प्रिया डुघरेकर यांनी भाविकांसाठी शीतपेयांचे वाटप केले.
दरवर्षी निघणार यात्रा : मागील वर्षीपासून गौर-नीताई म्हणजेच कृष्ण, बलरामांची रथयात्रा काढली जात आहे. गेल्या वर्षी जळगाव येथील इस्कॉनच्या मंदिरातून मूर्ती मागवल्या होत्या. या वर्षी पहिल्यांदाच पश्चिम बंगालमधील मायापूर येथून गौर- नीताई अशा दोन मूर्ती मागवल्या. मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन फुटांची लाकडी मूर्ती असून: ५० किलो वजनाची आहे. यापुढेही रथयात्रा निघणार असल्याचे प्रेमप्रभुदास यांनी सांगितले.
कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम, पाच हजार भाविकांसाठी महाप्रसाद दशमेशनगर येथून मिरवणूक निघाली. छत्रपती महाविद्यालय एन-३ येथे समारोप झाला. सायंकाळी कीर्तन झाले. गोपाल फन्स स्कूलतर्फे ३० मुले-मुलींनी भगवद्गीतेच्या श्लोकाचे पठण केले. इस्कॉन युवा मंचातर्फे कृष्णलीलांवर नाटिकांचे सादरीकरण केले. भरतनाट्यमचे सादरीकरण झाले. या वेळी सियाटल या देशातून हरिविलास महाराज व त्यांचे शिष्यांची उपस्थिती होती. या वेळी २ हजार भाविकांसाठी ५०० किलाेची खिचडी, १०० लिटर शेवई खीर वाटप करण्यात आली. एन-३ येथेही भाविकांसाठी प्रसाद वाटप केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.