आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हे शाखेची कामगिरी:फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याचे 1.60 लाख रुपये लुटणाऱ्या तिघांना अटक, कंपनीच्या कर्मचाऱ्यानेच दिली होती टीप

हिंगोली17 दिवसांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • जिंतूर येथील कंपनीच्या कर्मचाऱ्याचेही 1.15 लाख लुटले

वसमत जवळील कौठा पाटी येथे भारत फायनांन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यास चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी ता. 6 अटक केली आहे. यामध्ये कंपनीतील एका कर्मचाऱ्यानेच पैसे वसुलीची टीप दिल्याचे पोलिस चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडून एक दुचाकी व 1.60 लाख रुपये रोख जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील भारत फायनांन्स विमा कंपनीचे कर्मचारी अभिलाष येलगोड यांना ता. 31 मार्च 21 रोजी कौठा पाटी जवळ दुचाकीवर आलेल्या दोघांनी चाकुचा धाक दाखवून लुटले होते. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान, पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, अभय माकणे, भाग्यश्री कांबळे, जमादार किशोर कातकडे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्‍वर पायघन, शेख जावेद, जयप्रकाश झाडे, दीपक पाटील यांच्या पथकाने आरोपींची माहिती घेण्यास सुरवात केली होती. यामध्ये कंपनीच्याच एका कर्मचाऱ्याने टीप दिल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यावरून पोलिसांनी आणखी माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आज सकाळी विश्‍वजीत आनंदा शिनगारपुतळे (रा. मानसपुरी, जि. नांदेड) यास ताब्यात घेतले.

त्याने दिलेल्या माहितीनंतर नांदेड येथून ओमकार उर्प पमा रामराव फुले यास ताब्यात घेतले. त्या दोघांनी पैसे लुटल्याची कबुली दिली. मात्र सदर पैशाबाबत कंपनीतील कर्मचारी आकाश रमेश जोंधळे याने टीप दिल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी तिघांनाही अटक केली. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून 1.60 लाख रुपये व दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. त्यांची सखोल चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जिंतूर येथील कंपनीच्या कर्मचाऱ्याचेही 1.15 लाख लुटले
या तिघांनी जिंतुर येथील याच कंपनीच्या कर्मचाऱ्याचे 1.15 लाख रुपये लुटल्याचे प्राथमिक चैाकशीत स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी हा गुन्हा घडला होता. त्यामुळे आता त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...