आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना रुग्णांचे मतदान:सेनगाव, कुरुंदा येथील मतदान केंद्रावर तीन कोविड रुग्णांनी पीपीई किट घालून बजावला मतदानाचा हक्क

हिंगोली2 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • दोन दिवसांपासून होते उपचारासाठी दाखल

हिंगोली जिल्हयात सेनगाव व कुरुंदा (ता.वसमत) येथील मतदान केंद्रावर कोविड पॉझीटिव्ह रुग्णांनी पीपीई किट घालून मंगळवारी (ता. 1) मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्थाही करण्यात आली होती.

हिंगोली जिल्हयात पदवीधर मतदार संघात मतदारांना मतदान करता यावे यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली 39 मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांची कुठेही गैरसोय झाली नाही. तर सेनगाव येथील कोविड रुग्णालयात दोन तर वसमत येथील कोविड रुग्णालयात एक मतदार उपचार घेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी जयवंशी यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी थेट उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, प्रविण फुलारी, तहसीलदार जीवककुमार कांबळे, अरविंद बोळगे यांच्याशी संपर्क साधून संबंधीत मतदारास मतदान करण्यासाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सुचना दिल्या.

त्यानंतर सेनगाव येथील कोविड रुग्णालयातील दोन रुग्णांना पीपीई किट घालून मतदानासाठी तयार करण्यात आले. संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शेवटच्या टप्प्यात या दोघांचे मतदान ठेवण्यात आले. एका रुग्णवाहिकेतून त्यांना मतदान केंद्रावर नेण्यात आले. त्या ठिकाणी मतदान झाल्यानंतर त्यांना पुन्हा उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर वसमत येथील कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचे मतदान कुरुंदा येथील केंद्रावर होते. त्यांनाही सुमारे दहा किलो मिटर अंतरावर असलेल्या कुरुंदा येथील मतदान केंद्रावर रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर संपूर्ण मतदान केंद्र व परिसर निर्जंतुक करण्यात आला. पीपीई किट घातलेल्या या कोविड पॉझीटिव्ह मतदारांनी जिल्हा प्रशासन व उपविभागाने केलेल्या मदतीबद्दल आभारही मानले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser