आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादाैलताबादपासून जवळच असलेल्या भांगसीमाता गडाच्या पायथ्याशी असलेल्या शेततळ्यात बुडून तीन मित्रांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना साेमवारी सकाळी उघडकीस आली. प्रतीक आनंद भिसे (१५), तिरुपती मारुती कुदळकर (१५), शिवराज संजय पवार (१७) अशी मृतांची नावे आहेत. रविवारी दुपारी हे तिघे सायकल घेऊन जात हाेते तेव्हा कुटुंबीयांनी त्यांना दूर जाण्यास मनाई केली हाेती. मात्र इमारतीच्या खालीच खेळत आहाेत असे खाेटे सांगून शिवराजची व बहिणीची सायकल घेऊन त्यांनी गडाकडे धूम ठाेकली हाेती. तिथे शेततळ्यात पाेहण्याचा माेह त्यांच्या जिवावर बेतला.
बजाजनगरातील भोंडवे पाटील स्कूलच्या बाजूला असणाऱ्या सारा संगम सोसायटीमध्ये राहणारे प्रतीक, तिरुपती आणि शिवराज हे तिघे मित्र होते. प्रतीक लिटिल एंजल्स स्कूलमध्ये नववीत, तिरुपती हा ज्ञानभुवन इंग्लिश स्कूलमध्ये नववीत तर शिवराज हा राजा शिवाजी ज्युनियर कॉलेजमध्ये ११ वीला शिकत हाेता. रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास ते घराबाहेर गेले, रात्र झाली तरी आलेच नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी खूप शाेध घेतला. अखेर रात्री पाेलिस ठाण्यात मुले बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार पाेलिसांनीही शाेध सुरू केला.
एका ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे तिघे सिडकोच्या वडगाव-तिसगाव मार्गाने जाताना दिसून आले. त्याआधारे तिरुपतीचे वडील मारुती कुदलकर यांनी भांगसीमाता गडाच्या पायथ्याशी जाऊन शाेध घेतला. तिथे त्यांना दोन सायकली दिसल्या. पुढे शेततळ्याच्या पायथ्याशी जाऊन पाहिले तर तिन्ही मुलांचे कपडे दिसले. तळ्यात डाेकावून पाहिले तर तिघांचेही मृतदेह तरंगत हाेते, हे दृश्य पाहून मारुतीरावांनी हंबरडाच फाेडला. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसीचे फौजदार राहुल निर्वळ, कर्मचारी, मनपा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली व तिन्ही मृतदेह बाहेर काढले.
साेसायटीवर शाेककळा
कामगार असणाऱ्या आईवडिलांना हे तिन्ही मुले एकुलते एक हाेती. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच तिन्ही कुटुंबीयांना, साेसायटीतील सदस्यांना शाेक अनावर झाला हाेता. मृत तिरुपतीवर बजाजनगर येथील स्मशानभूमीत तर प्रतीकवर बुलडाणा तालुक्यात आणि शिवराज पवार याच्यावर पैठण तालुक्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्लास्टिकमुळे तळ्याबाहेर पडणे मुश्कील
दौलताबाद पोलिसांच्या मते, तिन्ही मुले भांगसीमाता गडाच्या पायथ्याशी फिरायला रविवारी दुपारच्या नंतर आली असतील. नारायण वाघमारे यांच्या शेतातील भरलेले शेततळे पाहून त्यांना पोहण्याचा मोह झाला. कपडे काढून ते पाण्यात उतरले. परंतु शेततळ्यात प्लास्टिक असल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने या मुलांना पाण्याबाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. हे तळे सुमारे २७ ते २८ फूट खाेल आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.