आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोडफोड न करता चोरी:‘एटीएम’मधून पैसे लुटणाऱ्या टोळीतील तिघांना पाठलाग करून पकडले, दोघे फरार;

औरंगाबादएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • धूत रुग्णालयासमोरील एटीएमवर पोलिसांनी छापा टाकताच आरोपी कारमधून पळाले

कुठलीही ताेडफाेड न करता लाेखंडी पट्टीचा चलाखीने वापर करून एटीएममधून लाखाे रुपये लंपास करणाऱ्या टाेळीतील तिघांना पाेलिसांनी बुधवारी रंगेहाथ अटक केली. त्यांचे दाेन साथीदार मात्र पळून गेले. या आराेपींच्या चाैकशीतून माेठी टाेळी हाती लागण्याची पाेलिसांना आशा आहे. एटीएममधून पैसे चाेरणारी ही टाेळी उत्तर प्रदेशची आहे. पकडलेले आराेपी दहावी- बारावीपर्यंतच शिकलेले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या आराेपींच्या टाेळ्या वेगवेगळ्या शहरांत जाऊन असे उद्याेग करतात. एप्रिलपासून अशा टोळ्या राज्यात दाखल झाल्या आहेत. मुंबई, नाशिक, परभणीतही असे घोटाळे समोर आले आहेत. पाच जुलैपासून औरंगाबादेतील एसबीआयच्या काही एटीएममध्ये संशयास्पद व्यवहार हाेत असल्याचा संशय हाेता. कारण या मशीनमधून पैसे काढल्याचे व्यवहार रद्द हाेण्याचे प्रकार वाढले हाेते. तेवढी रक्कम मात्र कमी भरत हाेती. संबंधित एटीएम सेंटरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता काही जणांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे जाणवले हाेते.

त्यामुळे एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्याचे काम करणारी इलेक्ट्रॉनिक पेमेंट सर्व्हिसेस व सीसीटीव्हीचे कंत्राट असलेल्या हेमब सोल्युशन या कंपनीचे कर्मचारी सतर्क झाले हाेते. बुधवारी मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक शरद इंगळे यांना सकाळी ११ वाजता कंपनीच्या मुंबईच्या कार्यालयातून फाेन आला. त्यात धूत रुग्णालयाच्या समाेरील एटीएममध्ये संशयित घुसला असून ताे पैसे काढत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून वेळ न दवडता इंगळे यांनी अंमलदार बाबासाहेब कांबळे, आडियाल, महाजन जारवाल, विलास पवार, संदीप भोटकर, संजय बनकर यांना सोबत घेऊन त्या दिशेने धाव घेतली. पोलिसांना कळवल्यानंतर कंपनीचे अधिकारी अभिजित निकुंभ, सुशील धुळे, आशिष खंडागळे, आशिष चव्हाण यांनीदेखील धाव घेतली.

या एटीएमपासून काही अंतरावर आराेपींचे दाेन साथीदार कार (यूपी ७०/ एफसी ०३८७) घेऊन उभे हाेते. पाेलिस व कंपनीचे लाेक एटीएमकडे धाव घेत असल्याचे त्यांनी पाहिले व तत्काळ कारमध्ये बसून त्यांनी जालना रस्त्याकडे गाडी दामटली. धुळे, निकम, चव्हाण, खंडागळे यांनी दुचाकीवरून कारचा पाठलाग केला. पाेलिसांनाही त्यांनी सतर्क केले. पाेलिस पाठलाग करत असल्याचे कळताच आराेपींनी मुकुंदवाडीच्या दिशेने न जाता धूत रुग्णालयाकडे कार वळवली. दोन दुचाकी व मुकुंदवाडी पोलिसांच्या व्हॅनने त्यांचा पाठलाग सुरू केला. आराेपींनी सुसाट कार उत्तरानगरी व पुढे सिंधीबन गावाकडे वळवली. गावात प्रवेश केल्यानंतर मात्र कारचा चालक गाेंधळला. अरुंद रस्त्यांमुळे कारचा वेगही कमी झाला होता.

आरोपींची मोड्स‌ ऑपरेंडी
एक आराेपी एटीएम सेंटरमध्ये जाताे, तर थाेड्या अंतरावर दाेघे कार घेऊन उभे राहतात. स्वत:चे कार्ड एटीएममध्ये टाकून ताे रक्कम काढण्याची प्रक्रिया सुुरू करताे. रक्कम, पिन क्रमांक टाकल्यानंतर मशीन पैसे मोजण्यास सुरुवात करते. त्याच वेळी आराेपी ज्या ठिकाणाहून पैसे बाहेर येतात (शटर अॅसेंब्ली) तिथे लाेखंडी पट्टी घुसवतात व आतील नाेटा वर-खाली करणाऱ्या रॉडला स्क्रू ड्रायव्हरने चलाखीने तोडतात. मशीनमध्ये अशी छेडछाड झाल्यास व्यवहार रद्द झाल्याची नोंद होते व ट्रेमधून वर आलेल्या नोटा दुसऱ्या ट्रेमध्ये पडतात. हीच वेळ साधत चाेर लोखंडी पट्टीने त्या नोटा बाहेर काढतात. या प्रक्रियेत पैसे बाहेर निघाले तरी व्यवहार रद्द झाल्याच्या नाेंदीमुळे खात्यातून रक्कम कपात हाेत नाही. याच तांत्रिक उणिवेचा गैरफायदा घेऊन ही टाेळी अनेक शहरांमध्ये फिरून पैसे लूट असते.

तुटलेला रॉड बसवण्यास ७० हजार खर्च

 • स्थानिक विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री काही अनोळखी तरुणांनी मोठ्या नेत्याचे पोस्टर विनापरवानगी एटीएम सेंटरच्या काचेला लावले. ते लावायला आलेल्यांच्या गाडीवर एसबीआयचा लोगो असल्याने त्यांना अडवले नाही.
 • परप्रांतीय टोळीकडून बहुतांश एसबीआय बँकेचेच एटीएम लक्ष्य केले गेले. त्या अनुषंगाने कारवाईची मागणी करणारे पत्र देखरेख करणाऱ्या कंपनीने तीन दिवसांपूर्वीच पोलिस आयुक्तांना दिले होते.
 • बुधवारी धूत रुग्णालयासमाेरील म्हाडा कॉलनीतील एटीएम सेंटरमध्ये २८ लाख रुपये होते. आराेपी लाेखंडी पट्टीने एटीएमचा राॅड ताेडतात. ताे पुन्हा बसवण्यासाठी ७० हजार रुपयांचा खर्च येतो.
 • पाेलिसांनी अटक केलेल्या आराेपींना त्यांच्या कारनाम्याचे फुटेज दाखवल्यानंतरही तिघे कबूल हाेत नव्हते. ‘ते’ आम्ही नाहीच यावर ते ठाम होते. जप्त केलेली आराेपींची कार प्रयागराज येथून भाड्याने आणलेली आहे.

दहा दिवसांत ६ एटीएममधून अडीच लाख रुपये काढले

 • चिकलठाण्यातील आंबेडकर चौकातील दोन एटीएममध्ये दोन वेळा असा प्रकार घडला. ५ जुलै व ७ जुलै राेजी प्रत्येकी ३० हजार काढले.
 • वाळूजमधील एटीएममधून ३० हजार रुपये.
 • मुकुंदवाडीतील इंदिरा भाजीमार्केटमधून ३० हजार.
 • एन-७ बळीराम पाटील हायस्कूल परिसरातील एटीएममधून ९० हजार काढले.
 • एन-६ मधील संभाजी कॉलनीतील एटीएममधून २० हजार रुपये काढले.
 • १४ जुलै रोजी म्हाडा कॉलनीतील सर्व्हिस रोडवरील एटीएममधून १३ हजार रुपये काढले. आराेपी पळून गेल्याने सात हजार रुपये मशीनमध्ये अकडले हाेते.
बातम्या आणखी आहेत...