आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे यांनी संस्थाचालक संवर्गातून भरलेला उमेदवारी अर्ज जैसे थे ठेवला आहे. त्यांनी अर्ज ठेवल्यामुळे रंगतदार निवडणूक होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीप्रणीत उत्कर्ष आणि भाजपप्रणीत विद्यापीठ विकास मंचच्या उमेदवारांत आता तीन ठिकाणी थेट तर शिक्षक मतदासंघात तिरंगी लढत होणार आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची अर्थसंकल्पीय अधिसभा बैठक आता सोमवार ऐवजी रविवारी (१२ मार्च) होणार आहे. यात अधिसभेतून व्यवस्थापन परिषदेत निवडून जाणाऱ्या उमेदवारांसाठी मतदान होणार आहे. नामांकन माघारी घेण्यासाठी सोमवारी सायंकाळी पाचपर्यंत अखेरची मुदत होती. ‘मंच’चे उमेदवार मंगरुळे यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न केले होते. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. मंगरुळे यांची लढत उत्कर्षच्या गोविंद देशमुखांविरोधात होइल. मंगरुळे दिग्गज उमेदवार असल्यामुळे क्रॉस व्होटिंग होण्याची दाट शक्यता अाहे. प्राचार्य संवर्गातून उत्कर्षचे भारत खंदारे, ‘मंच’च्या डॉ. विश्वास कंधारे यांच्यात फाइट होईल. पदवीधरमधून ‘उत्कर्ष’चे सुनील मगरे यांची लढत मंचच्या योगिता होके पाटील यांच्याशी होईल. मगरे अधिसभेत एससी राखीव प्रवर्गातून विजयी झाले. त्यांना आमदार सतीश चव्हाण यांनी खुल्या प्रवर्गातून उमेदवारी दिली. त्यामुळे मगरे यांना दगाफटका होऊ नये, याची उत्कर्षच्या नेत्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.
चौघांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब : परिषदेच्या ४ राखीव जागांवर प्रत्येकी एकच उमेदवार रिंगणात शिल्लक राहिल्यामुळे त्यांची आता १२ मार्चला निवडणुकीपूर्वी बिनविरोध निवड जाहीर होणार आहे. त्यामध्ये पदवीधर-व्हीजेएनटी प्रवर्गातून दत्तात्रय भांगे, प्राचार्य-एससी प्रवर्गातून डॉ. गौतम पाटील, संस्थाचालक-एसटी प्रवर्ग नितीन जाधव, शिक्षक-ओबीसी प्रवर्गातून डॉ. रविकिरण सावंत यांचा समावेश आहे.
‘मंच’ आणि ‘उत्कर्ष’च्या उमेदवारांत होणार थेट लढत संस्थाचालक गटातून डॉ. मेहेर पाथ्रीकर, प्राचार्य गटातून बाबासाहेब गोरे तर पदवीधर गटातून हरिदास सोमवंशी यांनी माघार घेतली आहे. ‘मंच’ आणि ‘उत्कर्ष’च्या उमेदवारांत थेट लढत होणार आहे. उत्कर्ष पॅनलकडून निवडून आलेले मुंजोबा धोंडगे यांच्यासह बामुक्टोच्या एका प्राध्यापकानेही शेवटच्या क्षणी माघार घेतली आहे. डॉ. अंकुश कदम, मंचचे डॉ. भगवानसिंग डोभाळ आणि स्वाभिमानी मुप्टाचे डाॅ. शंकर अंभोरे हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. या एकमेव संवर्गातून तिरंगी लढत होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.