आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोटच्या आईने नाकारले, मात्र त्यांना मिळाले एका नव्हे तर १८ मातांचे प्रेम
श्रीमती माधुरी जोशी यांचे पुत्रमंदार यांचे विशेष वृत्त
छत्रपती संभाजीनगर
घास भरवण्यासाठी आई मागे फिरत असते. त्याच वेळी एखाद्या चिमुकल्याला झोपवण्यासाठी मायेने थोपटणे सुरू असते. एखादे महिना-दीड महिन्याचे बाळ आईच्या कुशीत निर्धास्तपणे पहुडलेले..., हे चित्र आहे चिमुकल्यांच्या नंदनवनातील, अर्थात सिडको एन-४ मधील भारतीय समाजसेवा केंद्राच्या पहिल्या मजल्यावरील... या साऱ्यांना जन्म देणाऱ्या पोटच्या आईने नाकारले, मात्र केंद्रातील १८ मातांचे प्रेम त्यांना मिळाले.
भारतीय समाजसेवा केंद्रात गेल्या २६ वर्षांत १,२५६ चिमुकल्यांचे संगोपन केले. एखाद्याला आईने जन्मत:च कचरा कुंडीत टाकले, कोणी हॉस्पिटलमध्ये सोडून गेले, तर काही कुमारी मातांना सामाजिक बंधनामुळे बाळाला सोडले. अगदी १ दिवसाच्या बाळापासून ६ वर्षांच्या चिमुकल्यांना येथे सांभाळतात. त्यांचे बारसे करतात. विपरीत परिस्थितीतील बाळांना केंद्रातील १८ माता जिवापाड जपतात. ६ वर्षांपर्यंत त्यांचे संगोपन करतात. तोपर्यंत त्यांना हक्काचे पालक मिळतात. बाळाला टाकणाऱ्या कुटुंबांचे समुपदेशन केले जाते. त्यानंतर ते कुटुंब बाळाला स्वीकारते. गेल्या २५ वर्षांत ५०८ बाळांना दत्तक दिले, तर ६०० बाळांना पुन्हा आपले घर मिळाले. केंद्रात त्याचे लसीकरण, दुखणे सारे ही आईच पाहते. १९७९ मध्ये पुण्यातील डॉ. बानू काेयाजी यांनी ही संस्था स्थापन केली. छत्रपती संभाजीनगरात १९९५ मध्ये २ खोल्यांमध्ये हे केंद्र होते, आता १०० पेक्षा जास्त चिमुकले राहू शकतील, असे केंद्र उभारले आहे. डॉ. रश्मी बोरीकर, डॉ. राजेंद्र वैद्य, संजय मेहरांनी यासाठी पुढाकार घेतला. -----
रामदास यांनी आईच्या स्मरणार्थ २० दांपत्यांसाठी उभारला मोफत वृद्धाश्रम
श्रीमती विमल काळेकर यांचे पुत्रगिरीश यांचे विशेष वृत्त
छत्रपती संभाजीनगर | बालवयात वडिलांचे छत्र हरपले. आई वत्सला यांनी शेतमजुरीचे काम करून शिकवले. खासगी संस्थेत लागलो तेव्हा विनापगारी नोकरी केली. त्यामुळे आईची सेवा व्यवस्थित करता आली नाही. अन् ज्यावेळी पगार वाढला त्यावेळी ती जगात राहिली नाही. त्यामुळे आईच्या ऋणाची परतफेड करण्याची खंत कायम बोचत राहिली. आज तिच्या स्मरणार्थ माई वृद्धाश्रमाची सुरुवात करून २० आईंची सेवा करणार आहे. ही कहाणी आहे रामदास वाघमारे या शिक्षकाची.
सातारा परिसरातील रामदास वाघमारे मूळचे घनसावंगी येथील राहणारे. कुटुंबात ५ भावांपैकी २ भावांचे निधन झाले. वडिलांचेही लहानपणीच छत्र हरपले. त्यामुळे आईने शेतमजुरीचे काम सुरू केले. काबाडकष्टाने मुलांचे शिक्षण केले. शिक्षणासाठी रामदास शहरात आले. बंजारा कॉलनीतील वसतिगृहात राहिले. त्यांना खर्चासाठी आई पैसे पाठवत. शिक्षण झाल्यानंतर वाघमारे यांना एका खासगी संस्थेत जेमतेम पगारावर नोकरी मिळाली. उदरनिर्वाह चालत नसल्याने त्यांनी हॉटेलवर काम केले. सोबत आईसुद्धा राहत होती. २००९ मध्ये आईचे छत्र हरपले. २०१० मध्ये शाळेला शंभर टक्के ग्रँट मिळाले अन् कायमसुद्धा झाले. चांगले दिवस आले तेव्हा ती नव्हती. तिच्या ऋणाची परतफेड करण्यासाठी तिच्या स्मरणार्थ मुकुंदवाडी भाजी मार्केट परिसर येथे वृद्धाश्रमासाठी जागा भाड्याने घेऊन ‘माई वृद्धाश्रम’ सुरू केले. वृद्धाश्रमात २० वयोवृद्धांची सेवा केली जाईल. ५ खोल्या, बेड, गाद्या, इतर कामांसाठी २ खोल्या आहेत. सोलरही लावले आहे.
------
काळजात धडधड झाली, पण लेकराचा जीव वाचवण्यासाठी दिली किडनी
श्रीमती आशा शिंपी यांच्या कन्यारोशनी यांचे विशेष वृत्त
छत्रपती संभाजीनगर | किडनी प्रत्यारोपणाविषयी मी ऐकून होते. माझी किडनी काढण्याचा प्रकार अनोखा असल्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्यावर काळजात धडधड झाली होती. पण, लेकराचा जीव जास्त महत्त्वाचा होता, म्हणून मी तयार झाले. अशा ऑपरेशनमुळे शरीरावर जखम होण्याऐवजी फक्त तीनच टाके पडतील, असे डॉक्टरांनी सांगितले होते, असे ५५ वर्षीय गोदावरी कांबळे यांनी सांगितले.
शहरात शुक्रवारी मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. आदित्य येळीकर यांनी पहिल्यांदाच प्रत्यारोपणासाठी योनीमार्गाने किडनी बाहेर काढली. यासंदर्भात त्यांनी सांगितले की, किडनीदात्या महिलेला आम्ही हा पर्याय दिला. कारण, त्यांचे ‘मेनोपॉज’ झालेले होते. विशेष म्हणजे त्यांच्या प्रसूती सिझेरियनने झालेल्या नव्हत्या. अशा वेळी योनीमार्गातून किडनी काढणे हा उत्तम पर्याय ठरतो. या प्रक्रियेत दात्याच्या शरीराला मोठी इजा होत नाही. त्यामुळे ९.१ सेंटिमीटर आकाराची किडनी (मूत्रपिंड) तीन छोट्या छिद्रांच्या माध्यमातून काढली आहे. शस्त्रक्रियेत गोदावरी यांना फक्त ३ टाके दिले.
यापूर्वी किडन्या केरळमधील रुग्णालयात २०१९ पूर्वी अशा ५० केसेस करण्याचा अनुभव होता. अशा पद्धतीची केस येथे पहिल्यांदाच केली. कारण, यासाठी सर्व गोष्टी जुळून येणे व दात्याने तयार होणेही गरजेचे असते. गोदावरीबाईच्या केसमध्ये सर्व शक्यता जुळून आल्या. त्यामुळे राज्यातील पहिलीच शस्त्रक्रिया केली. नेहमीच्या तुलनेत किडनी दुखावण्याची जोखीम ५ टक्के अधिक होती, तरीही जोखीम घेतली, असे मूत्रविकारतज्ज्ञ डाॅ. आदित्य कानन येळीकर यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.