आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली शहरातील तीन तरुणांचा मोरगव्हाण (ता.कळमनुरी) शिवारातील इसापूर धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. 7) दुपारी घडली आहे. कळमनुरी पोलिसांनी व नागरीकांनी शोधाशोध करून तिघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. यामध्ये एक तरुण दुसऱ्या दोघांना वाचविण्यासाठी गेला असतांना तिघेही बुडाल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोलीतील पाच तरुण आज सकाळीत कळमनुरी तालुक्यातील मोरगव्हाण शिवारात इसापूर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पोहण्यासाठी गेले होते. आज सकाळी तेथे गेलेले निखील नागोराव बोलके, श्रीकांत संजय चोंढेकर, योगेश गडप्पा, रोहित अनिल चित्तेवार, शिवम सुधीर चोंढेकर यांनी पाण्याच्या काठावरच पोहण्याचा आनंद लुटला. त्यानंतर त्यांनी भोजन केले. त्यानंतर ते पुन्हा पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र रोहित चित्तेवार (20), शिवम चोंढेकर (21) यांना पोहणे येत नसल्याने ते काठावरच होते. मात्र कोणालाही काही कळण्याच्या आतच ते पाण्यात बुडाले. त्यामुळे या दोघांना वाचविण्यासाठी योगेश गडप्पा (20) याने पाण्यात उडी मारली. दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात पाण्यात असलेल्या रोहित चित्तेवार व शिवम चोंढेकर यांनी घाबरून योगेशला मिठी मारली. त्यामुळे तिघेही पाण्यात बुडाले अन त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, सदर प्रकार लक्षात आल्यानंतर पाण्याच्या बाहेर असलेल्या निखील बोलके व श्रीकांत चोंढेकर यांनी आरडा ओरड केली. त्यानंतर गावकरी मदतीसाठी धाऊन आले. तसेच या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजित भोईटे, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, जमादार पवार, वाढवे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस व नागरीकांच्या मदतीने मृतदेहाची पाण्यात शोधाशोध केली. त्यानंतर एक तासानंतर तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. त्यानतंर तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
चौघे जण शिक्षणासाठी होते नांदेडात
या घटनेमधील रोहित चित्तेवार, शिवम चोंढेकर, निखील बोलके व श्रीकांत चोंढेकर हे नांदेड येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी होते. सध्या संचारबंदी असल्याने महाविद्यालय बंद आहेत. त्यामुळे ते हिंगोलीत घरी आले आहेत. सुट्ट्या असल्याने त्यांनी आज मोरगव्हाण शिवारात जाण्याचे नियोजन केले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.