आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघात:एसटीच्या धडकेत तीन तरुण ठार, तिघेही मृत तरुण वैजापूर तालुक्यातील रहिवासी

वैजापूर/खंडाळा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव एसटीने समोरून येणाऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेने तीन तरुण जागीच जागीच ठार झाले. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ एच रस्त्यावरील खंडाळा शिवारातील जयेश पालेजा यांच्या पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी सायंकाळी ४:३० वाजता झाला. सोमनाथ साहेबराव निकम (२८, रा.शिऊर, ता. वैजापूर), कडुबा ज्ञानेश्वर ठुबे (२९), अमोल भाऊसाहेब ठुबे (२५, दोघे राहणार पोखरी, ता.वैजापूर) असे अपघातात जागीच ठार झालेल्या मृतांची नावे आहेत.

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळच्या सुमारास तिघेही तरुण वैजापूरहून त्यांच्या गावाकडे दुचाकीने (एमएच २० एफ एन ४१७२) परतत हाेते. खंडाळा गाव शिवारातील पालेजा यांच्या पेट्रोल पंपांजवळ समोरून वैजापूरच्या दिशेने औरंगाबाद - नाशिक या मार्गावर एसटीने (एम एच १४ बीटी ३३४४) दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघे जागीच ठार झाले. दुचाकीस्वारांना धडक दिल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने काही अंतरावर एसटी रस्त्याच्या खाली उलटली. यात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. आघूर येथील भाजप युवा मोर्चाचे केतन आव्हाळे यांच्यासह पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जखमींना वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यासाठी मदतकार्य केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिघे तरुण मृत झाल्याचे घोषित केले. फौजदार रज्जाक शेख, पोलिस अंमलदार संतोष सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली.

अपत्याच्या आगमनापूर्वीच घेतला जगाचा निरोप
पोखरी गावातील कडुबा ज्ञानेश्वर ठुबे युवकाचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. कुटुंबात तो एकुलता एक होता. त्याची पत्नी येत्या आठवड्यात प्रसूत होणार होती. घरात नवीन अपत्याचे आगमन होण्यापूर्वीच पित्याचा अपघाती मृत्यू झाला. याच गावात पेट्रोल पंपावरील कामगार अमोल ठुबे यांचाही अपघातात मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...