आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी दुर्घटना टळली:नायलॉन मांजाने कापला विद्यापीठाकडे जाणाऱ्या तरुणाचा गळा

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेगमपुऱ्यातून विद्यापीठाकडे जाताना चैतन्य शंकर मुंढे (१९) याचा नायलॉन मांजामुळे गळा कापला. वळणावर दुचाकीचा वेग कमी झाल्याने मांजा गळ्यात कमी रुतला व मोठी दुर्घटना टळली. मात्र, तरीही दोन दिवस त्याला बोलण्यात अडचण निर्माण झाली.

मूळ गंगाखेडचा असलेला चैतन्य मामाकडे राहून नीटची तयारी करतो. गुरुवारी रात्री तो डबा घेऊन विद्यापीठाकडे जात असताना त्याच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकून आठ इंच गळा कापला गेला. मांजा असल्याचे लक्षात आल्याने त्याने तत्काळ हाताने तो पकडला. यात बरेच रक्त वाहिले. त्याच्या मामाने धाव घेत त्याला रुग्णालयात दाखल केले.

एकही दुकान सील केले नाही
न्यायालयाने सुनावणीत पोलिसांनी कारवाई केल्यास मनपाने या विक्रेत्याचे दुकान बंद करुन शॉप अॅक्ट परवाना रद्द करण्याचे आदेश दिले होते . मात्र, शहरात तशी गंभीर कारवाई झालीच नाही. दरम्यान, नायलॉन मांजाचा गुन्हा जामीनपात्र आहे. परिणामी, कारवाईनंतर मांजा जप्त करून नोटीस देऊन सोडण्यात येते.

आतापर्यंत झाल्या ९० कारवाया
नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिस व मनपा प्रशासनाला अनेकदा दिले हाेते. २०२१-२२ मध्ये ९० कारवाया झाल्या. मोंढ्यातील ट्रान्सपोर्टमध्ये आलेला ८ लाखांचा मांजा वगळता पोलिस एकही गोडाऊन, बडा व्यापारी पकडू शकले नाही, हे विशेष. सर्व कारवायांमध्ये किरकोळ व्यापारी पकडले गेले.

लोकांसह १५ पक्षी झाले जखमी
१५ डिसेंबर रोजी दीपक संभेराव हे नायलॉन मांजामुळे कर्णपुरा परिसरात जखमी झाले होेते. आठ दिवसांपूर्वीच एक पक्षी विजेच्या तारेवर नायलॉन मांजात अडकला होता. त्यानंतर आता मांजामुळे अपघात झाल्याची तिसरी घटना आहे. तर दोन महिन्यांत नायलॉन मांजात अडकून जखमी झालेल्या एक वटवाघूळ व १५ पक्ष्यांवर उपचार केल्याचे पक्षिमित्र डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले. यात कोकीळ आणि कबुतरांची संख्या सर्वाधिक होती.

बातम्या आणखी आहेत...