आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज प्राप्त:अधिसभेसाठी गुरुवारी 29, आतापर्यंत 74 अर्ज प्राप्त; आज अखेरचा दिवस

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत पदवीधर प्रवर्गातून गुरुवारी २९ अर्ज दाखल झाले. आतापर्यंत ७४ अर्ज आले असून शुक्रवारी अर्ज करण्याचा अखेरचा दिवस आहे. सर्वाधिक ७४ अर्ज खुल्या प्रवर्गातून आल्याची माहिती कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भगवान साखळे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

अधिसभा, विद्या परिषद, अभ्यास मंडळ या प्राधिकरणांच्या निवडणुकांचा कार्यक्रम कुलगुरू तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात पदवीधर सिनेटच्या १० जागांसाठी २६ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. खुल्या गटातून पाच, तर आरक्षितमधून प्रत्येकी एक उमेदवार निवडून येणार आहे. आतापर्यंत ७४ अर्ज आले आहेत. यात खुल्या प्रवर्गातून सर्वाधिक ३७ अर्ज दाखल झाले. महिला- ६ अर्ज, अनुसूचित जाती -३, अनुसूचित जमाती- ३, इतर मागास वर्ग- ७, तर भटके विमुक्त जाती-जमाती प्रवर्गातून-१८ अर्ज दाखल झाले आहेत.

अपिलांवर सुनावणी पूर्ण
इतर मतदारसंघांतील अधिसभा निवडणुकीत दाखल अपिलांवर डॉ. येवले यांच्या उपस्थितीत व्यवस्थापन परिषद कक्षात बुधवार व गुरुवारी सुनावणी घेण्यात आली. यात प्राचार्य -८ अपील, महाविद्यालयीन प्राध्यापक- १५, तर विभागप्रमुख-७ अशा ३० अपिलांवर पहिल्या दिवशी सुनावणी झाली. संस्थाचालक प्रवर्गातून दाखल १५ अपिलांवर गुरुवारी सुनावणी घेतली गेली.

विद्या परिषदेसाठी आज आरक्षण सोडत
विद्या परिषद हेदेखील महत्त्वाचे प्राधिकरण आहे. या प्राधिकरणाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत होणार आहे. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम-२०१६ कलमाच्या ३२ (३) (छ) तरतुदीनुसार अध्यापक गटात पंधरा वर्षांपेक्षा कमी नसेल इतका अध्यापनाचा अनुभव हवा आहे. प्रत्येक विद्याशाखेचे प्रतिनिधित्व करणारे दोन अध्यापक, पैकी एक अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची किंवा विमुक्त जाती किंवा भटक्या जमातीची किंवा इतर मागासवर्गाची व्यक्ती असेल. प्रत्येक विद्याशाखेचे आरक्षण चिट्ठया टाकून सोडतीद्वारे ठरवण्यात येईल. कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी महात्मा फुले सभागृहात सोडत होईल. या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी केले आहे.

वंचितने दाखल केले ८ जणांचे नामांकन
डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत यंदा वंचित बहुजन आघाडीप्रणीत ‘परिवर्तन पॅनल’ने अधिकृतरीत्या उडी घेतली आहे. विद्यार्थी नेते प्रकाश इंगळे यांच्या नेतृत्वात १० जागांसाठी ८ जणांनी नामांकन दाखल केले आहे.

त्यात अॅड. पंकज बनसोड, अॅड. नंदा गायकवाड, विनोद आघाव, नितीन फंदे, रोहित जोगदंड, भागवत बर्डे, अनिश तडवी आणि पल्लवी खोतकर यांचा समावेश आहे. प्रारंभी विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून मिरवणूक काढली. त्यानंतर मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप झाला. या वेळी योगेश बन, प्रभाकर बकले, सतीश गायकवाड, लता बामणे, सिद्धार्थ तेजाद, नागसेन वानखडे, मेघानंद जाधव, सागर धोडपकर, संकेत कांबळे, ऋषी कांबळे, सिद्धार्थ कांबळे, राहुल कांबळे, हर्षवर्धन कांबळे, रोहिदास जोगदंड आदी उपस्थित होते

बातम्या आणखी आहेत...