आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:पावसाळ्यात पोलिस कर्मचाऱ्यांवर बेघर होण्याची वेळ, उशीराने जाग आलेल्या विभागाकडूनच निवासस्थाने रिकामे करण्याच्या नोटीसा

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • निवासस्थाने राहण्यालायक नसल्याचा अहवाल- यशवंत काळे, प्रभारी पोलिस अधिक्षक

हिंगोलीत पोलिस विभागाच्या अजब कारभाराचा नमुना पुढे आला असून कोविडयोध्दे समजल्या जाणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना पावसाळ्यामुळे निवासस्थाने रिकामे करण्याच्या सुचना दिल्या आहेत. आता पावसाळ्यात जावे कुठे असा प्रश्‍न या कर्मचाऱ्यांना भेडसावत असून १२६ पोलिस कर्मचाऱ्यांवर भर पावसाळयात बेघर होण्याची वेळ आली आहे. विभागाच्या या कार्यपध्दतीबद्दल कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांतून तिव्र अंसतोष निर्माण झाला आहे.

येथे पटलन भागात जूनी पोलिस वसाहत आहे. या ठिकाणी मागील अनेक वर्षापासून सुमारे १२६ पोलिस कर्मचारी राहतात. बहुतांश कर्मचारी हिंगोली शहर, हिंगोली ग्रामीण या शिवाय स्थानिक गुन्हे शाखा, पोलिस मुख्यालयातील आहेत. या पोलिस कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना अनेक समस्यांना समोरे जावे लागते. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहे या शिवाय जागा देखील अपुरी पडत अाहे. मात्र त्यानंतरही या वसाहतीकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.

दरम्यान, आता या वसाहतीमधील निवासस्थाने खिळखिळी झाली आहेत. पावसाळ्यात काही निवासस्थानांचे छत गळत आहे. मात्र त्याकडे पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होते आहे. एकीकडे वरिष्ठ पोलिस अधिकारी आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या दरबारात निवासस्थानांचा प्रश्‍न उपस्थित होते अन दुसरीकडे लवकरच दुरुस्ती होईल असे ठेवणीतील उत्तरे दिली जात आहेत.

त्यानंतर आता पोलिस अधिक्षक कार्यालयाने १२६ पोलिस कर्मचाऱ्यांना निवासस्थाने रिकामे करण्याच्या नोटीस दिल्या आहेत. आता पावसाळ्यात इतर ठिकाणी निवासस्थाने कशी मिळणार असा प्रश्‍न पोलिस कर्मचाऱ्यांतून उपस्थित केला जात आहे. निवासस्थाने रिकामी करण्यासाठी उन्हाळ्यात नोटीस का दिल्या नाही असा सवालही कर्मचारी अन त्यांच्या कुटुंबियांतून उपस्थित केला जात आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या या भुमीकेमुळे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांतून तिव्र असंतोष निर्माण झाला आहे.

कोविड काळात दिवस रात्र एक करून पोलिस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले आहे. मागील एक ते दिड वर्षापासून सतत कर्तव्यामुळे कर्मचाऱ्यांना घराकडे पाहण्यासाठी वेळही मिळाला नाही. त्यांनतर कोविड योध्दा म्हणून पाठीवर थाप देणाऱ्या खुद्द पोलिस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडूनच दिलेल्या नोटीस मुळे कर्मचऱ्यांतून नाराजीचा सुर उमटू लागला आहे. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.

निवासस्थाने राहण्यालायक नसल्याचा अहवाल ः यशवंत काळे, प्रभारी पोलिस अधिक्षक

सदर निवासस्थाने राहण्यालायक नसल्याचा अहवाल सार्वजनीक बांधकाम विभागाने दिला आहे. त्यावरून या नोटीस देण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांसाठी लवकरच ओआर ठेवला जाईल.

बातम्या आणखी आहेत...