आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता:पुण्याला जाण्यासाठी करावा लागेल उलटा प्रवास; क्रांती चौकापासून 12 किमीवर औरंगाबाद-पुणे एक्स्प्रेस वे

औरंगाबाद / नामदेव खेडकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबाद ते पुणे असा ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वे मंजूर केला. मात्र, या एक्स्प्रेस वेचा औरंगाबादला कितपत फायदा होईल याबाबत शंकाच आहे. कारण हा एक्स्प्रेस वे शहराच्या पूर्वेला १२ किलोमीटर अंतरावर असेल. म्हणजे एक्स्प्रेस वेला जाण्यासाठी क्रांती चौकातून किमान २० मिनिटे ते अर्धा तास लागू शकतो. जालना रोडवरील केंब्रिज चौकाच्याही एक किलोमीटरवरून हा एक्स्प्रेस वे जाणार आहे.

विदर्भातील नागरिकांना पुण्याची कनेक्टिव्हिटी सोयीस्कर व्हावी या उद्देशाने हा एक्स्प्रेस वे होणार आहे. कारण नागपूरवरून येणारा समृद्धी महामार्ग औरंगाबादमार्गे मुंबईला जातो. नागपूरहून समृद्धीमार्गे औरंगाबादपर्यंत आणि औरंगाबादहून नवीन एक्स्प्रेस वेने पुण्याला जाण्यासाठी विदर्भातील नागरिकांना सोयीचे होईल. औरंगाबाद शहरातून पुण्याला जाण्यासाठी आधी औरंगाबादच्या पूर्वेला उलटा प्रवास करावा लागेल. समृद्धी महामार्गावर शेंद्रा एमआयडीसी परिसरातील मल्हारपूर गावाजवळून हा एक्स्प्रेस वे सुरू होईल. तो पुढे जालना रोडवर केंब्रिज चौकाच्या पूर्वेला एक किलोमीटर अंतरावरून झाल्टा, सुंदरवाडी शिवारातून पुढे जाईल. झाल्टा फाट्याच्याही पूर्वेला एक किलोमीटर अंतरावरून पुढे आडगावमधून हा रस्ता पैठणच्या दिशेने जाईल. मध्ये बिडकीन डीएमआयसीच्या पूर्वेला आठ किलोमीटरवर हा रस्ता असेल.

डीपीआर तयार, लवकरच भूसंपादन
भूसंपादन, रस्ता बांधणीसाठी साधारणपणे १२ हजार कोटींचा खर्च येईल. या मार्गाचा डीपीआर तयार झाला असून लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरू होईल. एकूण १०० मीटर रुंदी आणि २८६ किलोमीटर लांबी असलेल्या या रस्त्याची बांधणी १२० किमी प्रतितास या वेगाने वाहने धावतील अशी केली जाणार आहे. हा रस्ता औरंगाबादच्या पूर्व बाजूने (जालना रोड) सुरू होऊन पुण्याच्या दक्षिणेला (सातारा रोड) समाप्त होईल.

बिडकीनसाठी आठ किमीचा जोड
भविष्यातील औद्योगिक वाहतुकीसाठी डीएमआयसी ते एक्स्प्रेस वे असा पूर्वेला आठ किलोमीटर लांबीचा जोड दिला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...