आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​वाळूजमधील स्थिती:शंभर रुपये वाचवण्यासाठी शेकडो ट्रक रस्त्यावर, टर्मिनल मात्र पडले ओस!

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयडीसी प्रशासनाने वाळूज येथील कामगार चौकात तीन एकर जागेवर २५० वाहन क्षमतेचे सर्व सुविधायुक्त ट्रक टर्मिनल उभारले आहे. मात्र, केवळ १०० रुपये वाचवण्यासाठी बहुतांश वाहनचालक त्यांची वाहने रस्त्यावरच उभी करतात. या वाहनाकडे वाहतूक शाखेचे पोलिस दुर्लक्ष करतात. दिवसेंदिवस मुख्य मार्गाच्या दुतर्फा ट्रक, कंटेनर आदी अवजड वाहने उभी केल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. कामगार चौकात साडेतीन एकर जागेवर भव्य ट्रक टर्मिनल उभारण्यात आले आहे. तेथे २५० वाहने उभी राहतील एवढी क्षमता आहे. औद्योगिक परिसरात लहान-मोठे ३ हजार ७०० कारखाने आहेत. कारखान्यात दररोज ४०० पेक्षा आधिक अवजड वाहने येतात. मात्र, त्यातील केवळ २० टक्के वाहने टर्मिनलमध्ये उभी राहतात. उर्वरित ८० टक्के म्हणजेच ३२० पेक्षा अधिक वाहने कारखान्यासमोरील रस्त्यांवरच उभी केली जातात.

बँकेचे ५ कोटींचे प्रकरण न्यायप्रविष्ट : २०१०-११ मध्ये एम-सेक्टरलगतच्या पी-१७५ या ११ एकरच्या भूखंडावर टर्मिनल उभारण्याची परवानगी भारत उद्योग कंपनीला देण्यात आली होती. कंपनीने एका खासगी बँकेकडे हा भूखंड तारण ठेवून बँकेकडून ५ कोटी रुपये घेतले. दिलेल्या वेळेत टर्मिनल न उभारल्याने हा करार रद्द करण्यात आला. नंतर या भूखंडावर बँकेने जप्ती आणली. त्यासोबतच एमआयडीसीच्या एनओसीशिवाय एमआयडीसीच्या भूखंडावर बँकेने तारण दिल्याने एमआयडीसी प्रशासन कोर्टात गेले. सध्या बँक, एमआयडीसी व भारत उद्योग यांच्यातील वाद न्यायप्रविष्ट आहे.

५-७ किलोमीटरचा फेरा पडत असल्याने टर्मिनलमध्ये ट्रक उभे करणे टाळतात सध्या सुरू असलेले ट्रक टर्मिनल कामगार चौकात आहे. तेथे ए सेक्टर ते एनडीसी चौकाच्या परिसरातील कारखान्यात माल घेऊन येणारे वाहनधारक वगळता एआरडी चौक ते मायलॉन, युनायटेड ब्रेव्हरेज, सिमेन्स तसेच जोगेश्वरी परिसरातील एम सेक्टर परिसरात माल घेऊन येणाऱ्या वाहनधारकांना ५ ते ७ किमतीचे अंतर जास्त पडत असल्याने ते टर्मिनलमध्ये ट्रक उभे करणे टाळतात. पैसे वाचवणे, माल लोडिंग-अनलोडिंग करण्यासाठी असणारी ‘लॉबी’ अशीही कारणे समोर आली.

ट्रक टर्मिनलसाठी ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी दर, तरीही चालकांनी फिरवली पाठ एमआयडीसीने १ एप्रिल २०२२ रोजी २३ लाख ४९६ रुपयांत एका खासगी संस्थेला हे टर्मिनल ११ महिन्यांच्या करारावर चालवण्यास दिलेले आहे. कोणत्या वाहनाकडून किती शुल्क आकाराचे याचे दरही निश्चित करून दिले आहेत. त्यापेक्षा कमी शुल्क आकारण्याची मुभा आहे. ४ टायर वाहनाला ३० रुपये, ६ डायरला ६० रुपये तर १० व त्यापेक्षा आधिक टायच्या वाहनांसाठी १०० रुपये प्रति १२ तास असे दर आहेत. मात्र, प्रत्यक्षात १० ते २० रुपये कमी दराने शुल्क आकारणी केली जात असूनही चालक या टर्मिनलकडे पाठ फिरवत आहेत.

बातम्या आणखी आहेत...