आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी ओसरले, बांधावर नेत्यांचा पूर!:दौऱ्याचे सोपस्कार...मदतीचा ‘पूर’ आणणार का? केंद्राकडून मदतीसाठी शरद पवार दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्यासह केंद्राचीही मदत गरजेची : शरद पवार

परतीच्या पावसाने खरीप हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. पाणी ओसरताच आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह ठाकरे मंत्रिमंडळातील सात मंत्र्यांनी रविवारी बांधावर जाऊन अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली. दौऱ्याचे हे सोपस्कार पार पडल्यानंतर मदतीचा ‘पूर’ येणार का? असा सवाल आहे.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्यासह केंद्राचीही मदत गरजेची : शरद पवार

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. पिकांच्या नुकसानीसह बऱ्याच ठिकाणी शेतातील मातीच वाहून गेल्याचे दिसून येत आहे. हे नुकसान सहन करण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये नाही. त्यामुळे राज्य सरकारसह केंद्र सरकारनेही शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. पवार यांनी रविवारी उस्मानाबाद-लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. त्या वेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख त्यांच्यासमवेत होते. पवारांंनी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबावाडी, लोहारा तालुक्यातील सास्तूर, राजेगाव, एकोंडी शिवारातील नुकसानीची पाहणी केली.

कवड्याच्या माळेने तुळजापुरात स्वागत

तुळजापूर येथे हेलिपॅडवर नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी पवार यांना तुळजाभवानी देवीची कवड्यांची माळ भेट दिली. तुळजापूर पालिकेत सत्ता राष्ट्रवादीच्या चिन्हावर आलेली असली तरी सध्या हे राष्ट्रवादीचे सत्ताधारी भाजपच्या गोटात आहेत. या वेळी पवारांच्या स्वागतासाठी अनेकांनी पुष्पगुच्छही आणले होते, परंतु त्यापैकी औपचारिकता म्हणून पवार यांनी केवळ एक पुष्पगुच्छ स्वीकारला.

नांदेड जिल्ह्यात मंत्री वडेट्टीवारांचा ताफा अडवला

मुखेड तालुक्यातील सलगरा येथे राज्याचे पुनर्वसन व मदत मंत्री विजय वडेट्टीवार हे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी रविवारी येथे आले असताना शेतकरी पुत्रांनी त्यांच्या वाहनाचा ताफा अडवून ‘पाहणी नको, मदत द्या’च्या घोषणा दिल्या. या वेळी आमदार डॉ. तुषार राठोड व माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या व्यथा वडेट्टीवार यांच्यासमोर मांडल्या व तत्काळ मदतीची मागणी केली. वडेट्टीवार यांनी धावता दौरा मुखेडला केला. पण हा दौराही केवळ दोन मिनिटांत आटाेपला. दरम्यान, प्रसंगी कर्ज काढू, परंतु शेतकऱ्यांना मदत देऊ, असे आश्वासन वडेट्टीवार यांनी नांदेड येथील आढावा बैठकीनंतर दिले.

सांगली, कोल्हापूर, रत्नागिरीत आढावा बैठक

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी रविवारी सांगली, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर तर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. सांगली येथे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नुकसानीचा आढावा घेण्यात आला.

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदतीचा निर्णय बुधवारी कॅबिनेटमध्ये घेऊ : मुंडे

बीड | अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाकडून मदत देण्याचा निर्णय येत्या बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेऊ, असे सांगत पालकमंत्री धनंजय मुंडे रविवारी यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर आदी पिके काढणीच्या वेळेतच नेमकी अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याची पाहणी करण्यासाठी मुंडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी वडवणी, माजलगाव व गेवराई तालुक्यातील गावांचा दौरा केला. पीक विमा मिळावा याकरिता प्रशासनाने केलेले पंचनामेच ग्राह्य धरण्याची मागणी आम्ही विमा कंपन्यांकडे करणार असल्याचे आश्वासन मुंडे यांनी या वेळी दिले.

बातम्या आणखी आहेत...