आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:क्यूआर कोड स्कॅन करताच पर्यटनस्थळाची माहिती; भारतीय पुरातत्त्व विभागाचा उपक्रम

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

शहरातील ऐतिहासिक वास्तूंना भेट देणाऱ्या पर्यटकांना त्याचा इतिहास, वैशिष्ट्य याविषयी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते. मात्र, शहरातील बहुतांश पर्यटनस्थळांजवळ लावलेले बोर्ड खराब झाले. माहिती पूर्ण वाचता येत नव्हती. नंतर पुरातत्त्व विभागाने पुस्तिका, लिफलेट अशा माध्यमातून माहिती उपलब्ध करून दिली होती. मात्र, आता पेपरलेस कामकाजाचा पुरस्कार करताना ही सर्व साधने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे पर्यटकांना माहिती देण्यासाठी क्यूआर कोडचा वापर केला जाणार आहे. विशेष म्हणजे पर्यटकांना आपल्या मातृभाषेत माहिती उपलब्ध होऊ शकेल. पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आल्याचे पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्यात बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, वेरूळ-पांडव लेणी येथे पर्यटकांना माहिती उपलब्ध करून देण्यासाठी क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. हा काेड मोबाइलवर स्कॅन करून गुगल कन्व्हर्टरवर टाकावा लागतो. त्यानंतर मराठीसह अन्य भाषा निवडल्यास त्या वास्तूबद्दलची इत्थंभूत माहिती उपलब्ध होते. वास्तूंमध्ये विविध ठिकाणी हे क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. या माध्यमातून ऐतिहासिक स्थळांची माहिती उपलब्ध होण्याचे प्रमाण १०० टक्के नाही, मात्र ८५ ते ९५ टक्के माहिती योग्य भाषा आणि शब्दांचा वापर करून देण्यात आल्याचे पुरातत्त्व विभागाने म्हटले आहे. या प्रयोगाचा नागरिकांना चांगलाच फायदा होईल. पर्यटकांसाठी ही सोय सहज उपलब्ध झाल्याने वास्तूंची अचूक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे शक्य होईल.

या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन एएसआय कार्यालयात करण्यात आले. शहरालगतच्या वास्तूंमध्ये क्यूआर स्कॅनची सोय असल्याने कुणालाही सहजरीत्या माहिती मिळणार आहे. पर्यटकांना डिजिटल माहिती उपलब्ध करून दिल्याने फसवणुकीचा धोकाही टाळला जाणार आहे. पर्यटकांना सहज समजेल अशा मातृभाषेत वारसास्थळाची माहिती उपलब्ध होणार असल्याने प्रत्येकाला याचा फायदा घेता येईल, असा विश्वास विभागाने वर्तवला आहे.

बातम्या आणखी आहेत...