आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादख्खन का ताज’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बीबी का मकबराकडे जाणारा टाऊन हॉल मार्गे मकई गेटपर्यंतचा रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांमुळे उद्ध्वस्त झाला आहे. विद्यापीठात दररोज जाणारे प्राध्यापक, विद्यार्थ्यांना तसेच पर्यटकांना इथून जाताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत हा रस्ता दुरुस्तीची अजूनही प्रतीक्षा आहे.
हा रस्ता दुरुस्त करावा यासाठी विविध पक्ष-संघटनांनी वारंवार निवेदने दिली, परंतु महानगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. या रस्त्यावरून नियमित ये-जा करणाऱ्यांपैकी अनेक वाहनचालकांंना आता पाठीचा त्रास सुरू झाला आहे. पूर्वी माजी नगरसेवक सय्यद मतीन यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. पण आता त्यांचीही टर्म संपल्याने फारसे कुणी लक्ष देत नाही.
राज्य शासनाने दिलेल्या ३१७ कोटी रुपयांतून हा रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव होता. पहिल्या टप्प्यात तर हा रस्ता तयार करण्यात आला नाही. परंतु आता जी-२० ची टीम शहरात येणार असल्याने आता तरी तो दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
टेंडर निघाले, काम होईल
रस्ता तयार करण्यासाठी वारंवार निवेदने दिली. त्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, मनपाचे तत्कालीन आयुक्त आस्तिककुमार पांडेय, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या सहकार्यामुळे या कामाचे टेंडर निघाले. लवकरच रस्ता होईल.- सय्यद मतीन, माजी नगरसेवक
दीड महिन्यात काम होईल
राज्य शासनाने दिलेल्या ३१७ कोटींच्या निधीतून रस्त्याच्या कामाचे टेंडर झाले आहे. मनपा आयुक्तांनी आदेशही दिले आहेत. १५ जानेवारीपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे या रस्त्याची समस्या लवकरच सुटेल.- इम्रान खान, प्रोजेक्ट मॅनेजर, स्मार्ट सिटी
रुग्णांना दवाखान्यात न्यायचे कसे?
अशा रस्त्यावरून रुग्णांना दवाखान्यात न्यायचे कसे? लहान मुलांना, महिलांना, वृद्धांना पायी चालायलाही त्रास होतो. मनपाला मात्र त्याचे गांभीर्य नाही.- मिर्झा बरकत, रहिवासी
पायी जाणाऱ्यांनाही मोठा त्रास
या रस्त्यावर दुचाकी चालवताना तर त्रास होतोच, पायी चालणाऱ्यांनाही तेवढाच त्रास आहे. मागील अनेक वर्षांपासून मनपा प्रशासन याकडे काहीच लक्ष देत नाही.
- सय्यद अलीम बेग, रहिवासी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.