आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसुलावरही परिणाम:टीव्ही, एसीवरील 28 % जीएसटीमुळे व्यापारी नाराज ; आश्वासन देऊनही जीएसटी कमी केला नाही

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने टीव्ही आणि एसीवर सध्या असलेला २८ टक्के जीएसटी चालू आर्थिक वर्षात १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची ग्वाही दिली होती. मात्र या आर्थिक वर्षातील सहा-सात महिने उलटले तरी अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील व्यापाऱ्यांकडून सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. जीएसटीचे प्रमाण जास्त असल्याने वस्तूंचे दर वाढलेत. त्याचा विक्रीवर आणि परिणामी शासनाच्या महसुलावरही परिणाम होत आहे. तरी सरकारने तातडीने हा कर कमी करावा, अशी मागणी होत आहे.

‘जीएसटी’ लागू करताना प्रत्येक वस्तू व सेवांचा कर वेगवेगळा ठेवण्यात आला आहे. यात कमाल दर साधारणत: १८ टक्केच असेल असे गृृहीत धरले होते. मात्र काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर २८ टक्क्यांपर्यंत कर लादण्यात आला आहे. यात मोठे टीव्ही, एसी आदी वस्तूंचा समावेश आहे. औरंगाबादसह देशभरातील इलेक्ट्रॉनिक्स व्यापाऱ्यांनी दिल्लीपर्यंत पाठपुरावा करत या जीएसटी कराचा स्लॅब कमी करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी चालू आर्थिक वर्षात हा कर १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची ग्वाही अर्थसंकल्पाच्या वेळी दिली होती. मात्र आता नोव्हेंबर महिना संपत आला तरी त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

अर्थमंत्र्यांनी शब्द पाळावा केंद्र सरकारने टीव्ही व एसीवरील जीएसटी कर २८ टक्क्यांपर्यंत वाढवल्याने या वस्तूंच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. त्याचा स्थानिक व्यापाऱ्यांना मोठा फटका बसत आहे. अर्थमंत्र्यांनी १८ टक्के जीएसटी करण्याचे आश्वासन पाळावे एवढीच अपेक्षा. - पंकज अग्रवाल, व्यापारी.

‘विदाऊट जीएसटी’ देता का? व्यावसायिक क्षेत्रातील ग्राहक एसीचा सेटअप विकत घेतात. पण घरगुती ग्राहक २८ टक्के जीएसटी शुल्क बघूनच नाक मुरडतात. ‘विदाऊट जीएसटी काही जमतं का’ अशी विचारणा आधी करतात. मात्र तसे करता येत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितल्यावर बहुतांश जण खरेदी करणे टाळतात. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होतो. शासनाचाही महसूल बुडतो. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कर कमी करावा. - सुनील गावरसकर, विक्रेते

बातम्या आणखी आहेत...