आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजचेच वाद:पथविक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या, ‘अतिक्रमण हटाव’ची नावापुरती कारवाई

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात विविध ठिकाणी दुकानांसमोर ठिय्या मांडणाऱ्या पथविक्रेत्यांबद्दल दुकानदारांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भर रस्त्यावर हातगाड्या लावणे, टोपली घेऊन उभे राहणे यामुळे वाहतुकीचीही समस्या निर्माण होत आहे. या पथविक्रेत्यांमुळे दुकानदार, पादचारी आणि वाहनधारक चांगलेच त्रस्त आहेत. महापालिकेकडे अनेकदा तक्रारी करूनही ही समस्या सुटत नसल्याने व्यापारी नाराज आहेत. अतिक्रमण हटाव पथक फक्त नावापुरतीच कारवाई करते, अशी त्यांची तक्रार आहे.

हडको टीव्ही सेंटर, गजानन महाराज मंदिर परिसर, जटवाडा रोड या भागांत पथविक्रेत्यांनी रस्त्यांवर ताबा मिळवला आहे. फुटपाथव्यतिरिक्त ते रस्त्यावरही हातगाड्या उभ्या करतात. त्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होते. वाहनाचा धक्का लागला तर त्यावरून वाद होतात. दुकानांमध्ये जाण्यासाठी रस्ता राहत नसल्याने दुकानदारांचे त्यांच्याशी वाद होतात. बाजूला गाडी लावा असे म्हटले तर हे पथविक्रेते दुकानदारांना शिवीगाळ करतात. महानगरपालिकेचा अतिक्रमण प्रतिबंधक विभाग या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढत नाही, अशा तक्रारी दुकानदारांनी केल्या.

दुकानात यायला जागा नसते हातगाडी चालक ग्राहकांना दुकानात यायला जागा ठेवत नाहीत. त्यांची दादागिरी इतकी वाढली आहे की ते मारायलाच धावतात. पोलिस, मनपा कोणीही आम्हाला मदत करत नाही. - सजनराज बागरेचा, व्यापारी, गजानन मंदिर

पुन्हा मोहीम सुरू करू पथविक्रेत्यांवर नियमित कारवाई सुरू असते. तरी ते पुन्हा पुन्हा येतातच. आता पुन्हा तीव्र कारवाई करण्यात येईल आणि व्यापाऱ्यांची समस्या सोडवण्यात येईल. - रवींद्र निकम, अतिरिक्त आयुक्त, मनपा

रस्त्यावर गाडी लावू नका म्हटले की वाद घालतात फुटपाथवरील, दुकानांच्या पार्किंगमधील तसेच रस्त्याच्या बाजूला हातगाडी लावू नका असे म्हटले की पथविक्रेते शिवीगाळ करतात. त्यामुळे आम्ही अत्यंत त्रस्त झालो आहोत. - मुकुंद माळी, दुकानदार, टीव्ही सेंटर

सर्व कचरा आमच्या दुकानासमोर टाकतात हातगाडीधारक आपले साहित्य विकल्यानंतर झालेला कचरा पार्किंगमध्ये किंवा रस्त्यावरच टाकून जातात. त्यामुळे घाण होते. कचरा उचलणारेही आमच्याच नावाने ओरड करतात. - मनोज कोडी, इंटरनेट कॅफे चालक, टीव्ही सेंटर

बातम्या आणखी आहेत...