आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची हजेरी:परभणीत वाहतूक ठप्प; हिंगोलीमध्ये वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू,1 गंभीर

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी परभणी जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला. परभणी ते जिंतूर महामार्गावरील झरी येथील नाम नदीवर पुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळवण्यात आली आहे. मात्र या मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. जेसीबीच्या मदतीने रस्ता मोकळा करण्यात आला. जिंतूर तालुक्यातील बोरी व इटोली, पूर्णा तालुक्यातील ताडकळस व लिमला, सेलू तालुक्यातील दूधना नदी किनारी असलेल्या गावांत दुपारी साडेतीननंतर मुसळधार पाऊस झाला. तसेच हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जयपूर शिवारात अंगावर वीज पडून ३५ वर्षीय एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर सोबत असलेला मजूर गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले आहे.

दोन तासांनंतर जेसीबीच्या मदतीने रस्ता मोकळा परभणी| परभणी शहर व जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शनिवारी दुपारी साडेतीननंतर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे परभणी ते जिंतूर महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. मागील एक तासापासून झरी व परिसरात ढगफुटीसदृश पाऊस पडला. जिंतूर-परभणी रोडवरील पर्यायी पुलावर पाणी साचल्याने वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. संबंधित कंत्राटदाराने जेसीबी मागवून रस्ता मोकळा केला. तसेच झरी येथील नाम नदीवर पुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक पर्यायी मार्गांवरून चालू आहे. जोरदार झालेल्या पावसाने पाणी तुंबले. परिणामी परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील अनेकांच्या घरांत पाणी शिरले असून जवळच असलेली नाम नदीच्या जवळील आनंदनगर भागातील घरात पाणी शिरले.

जयपूर शिवारात पडली वीज
सेनगाव तालुक्यातील जयपूर शिवारात शनिवारी दुपारी शेतात झाडाखाली थांबलेल्या शेतकरी व शेतमजुराच्या अंगावर वीज पडली. यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून मजूर गंभीर जखमी झाला. नागनाथ दत्तराव पायघन (३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

सेनगाव तालुक्यातील जयपूर येथील नागनाथ पायघन यांचे जयपूर शिवारात शेत आहे. शनिवारी सकाळी नागनाथ पायघन व शेतमजूर दत्ता पायघन हे शेतात कामासाठी तसेच पीक पाहणीसाठी गेले होते. दुपारपर्यंत शेतात काम केल्यानंतर दीड ते दोन वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागनाथ व दत्ता हे दोघेही शेतातील झाडाखाली थांबले होते. याच वेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. दरम्यान, त्यांना परिसरातील शेतकऱ्यांनी रिसोड येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र नागनाथ पायघन यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले, तर दत्ता पायघन यांना उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...