आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यात कोरोना लसीकरण मोहिमेची रंगीत तालीम शनिवारी पार पडली. शहरी भागात प्रक्रिया सुरळीत झाली. ग्रामीण भागात मात्र ‘इंटरनेट कनेक्टिव्हिटी’सारख्या अडचणींचा सामना करावा लागला.
प्रत्यक्ष लसीकरणादरम्यान येणाऱ्या संभाव्य त्रुटींचा अंदाज घेता यावा म्हणून देशभरात शनिवारी त्याचा सराव करण्यात आला. पुणे, नंदुरबार, नागपूर व जालन्यात २९९ जणांवर लसीचे प्रात्यक्षिक झाले. मात्र चारही ठिकाणी वेगवेगळे चित्र दिसले. शहरी भागात किरकोळ त्रुटी वगळता ही रंगीत तालीम यशस्वी पार पडली. तथापि, खुद्द आरोग्यमंत्री राजेश टाेपे यांच्या उपस्थितीत जालन्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटीने गाेची केली. यामुळे दुर्गम, आदिवासी भागांत या प्रक्रियेसाठी आवश्यक ‘इंटरनेट कनेक्टिव्हिटी’चा मुद्दा कळीचा ठरण्याची चिन्हे आहेत.
असे होणार लसीकरण
1. काे-विन साॅफ्टवेअरवर लाभार्थीची आेळखपत्रासह नाेंदणी केली जाईल.
2. लाभार्थीस एसएमएसवर त्याचा लसीकरण दिनांक, वेळ व ठिकाणाची माहिती मिळणार.
3. लसीकरण केंद्रावर यादीत नाव तपासून आणि आेळखपत्र पाहून लाभार्थीस प्रवेश मिळेल.
4. अधिकारी नाव आणि ओेळखपत्राची काे-विन अॅपवर तपासणी करतील.
पुणे, नागपुरात थेट ‘नेट’
पुणे आणि नागपुरात इंटरनेट सुरळीत होते. नागपूर येथे डागा रुग्णालयात व्यवस्थापनातील काही त्रुटी वगळता अन्यत्र नियोजनानुसार मोहीम फत्ते झाली. प्रत्यक्ष लसीकरण प्रक्रियेला प्रत्येकी पाच मिनिटे लागणार असली तरी त्यानंतर अर्धा तास तेथेच थांबावे लागणार असल्याने एकुणात प्रत्येकासाठी ३५ मिनिटांचा कालावधी लागणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील तीन केंद्रांवर शनिवारी सकाळी एकूण ७४ जणांवर लसीकरणाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. नंदुरबारच्या अक्कलकुवा, धडगाव यासारख्या अतिदुर्गम भागात जेव्हा प्रत्यक्ष लसीकरण मोहीम सुरू होईल तेव्हा लाभार्थींना जवळपास इंटरनेटची सुविधा जेथे असेल तेथे वाहनांद्वारे आणले जाईल यादृष्टीने नियोजन करण्याचे प्रयत्न स्थानिक प्रशासनातर्फे सुरू आहेत.
- लसीचा काही विपरीत परिणाम हाेताे का याची 30 मिनिटे पाहणी. लसीकरण वैद्यकीय अधिकारी पाहणी करून नाेंद करणार. - एसएमएसवरील माहितीप्रमाणे ठराविक कालावधीनंतर लसीकरणाचा दुसरा डाेस.
‘सरकारी’ पद्धतीचा प्रत्यय
रंगीत तालमीदरम्यान काही ठिकाणी ‘सरकारी’ कामाचा प्रत्यय आला. नंदुरबारच्या नवापूर येथील केंद्रावर ठिकठिकाणी कापसाचे बोळे पडलेले होते. कर्मचाऱ्यांना तर अस्वच्छ पाण्यानेच हात धुणे भाग पडले.
टोपेंसमोरच अॅप बंद; नंदुरबारच्या काही भागांत अडचणी
जालना येथे सकाळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत रंगीत तालमीला सुरुवात झाली, पण या प्रक्रियेत अनिवार्य असणारे ‘कोविन अॅप’ व्यवस्थित चालण्यासाठी इंटरनेटला आवश्यक स्पीडच नव्हता. यामुळे अॅप चालू शकले नाही. परिणामी, अॅपवर संबंधित लाभार्थींच्या माहितीची पडताळणी केल्याविनाच या ‘ड्राय रन’ला पुढची प्रक्रिया पार पाडावी लागली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.