आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पॉझिटिव्ह:दोन ते 6 वयोगटातील मुलांच्या 40 पालकांना दिले प्रशिक्षण, आता हे पालकच मुलांना शिकवतात, शिक्षकाकडून होते व्हिडिओचे मूल्यांकन

औरंगाबाद ( गिरीश काळेकर )2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्ले ग्रुप ते केजीच्या मुलांना लॅपटॉप, मोबाइल न वापरता मोफत शिक्षण; औरंगाबादच्या शिक्षकाचा उपक्रम

शाळा सुरू होतील तेव्हा होतील, पण शहरातील शिक्षक रोहित गिरी यांनी २ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोबाइल, लॅपटॉप स्क्रीन न वापरता ऑनलाइन मोफत शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी त्यांनी ठरावीक पालकांना तीन दिवसांचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर दिलेला अभ्यास ते मुलांकडून करून घेतात. नंतर त्याचा व्हिडिअो टेलिग्रामवरील ग्रुपवर शेअर करतात. मग शिक्षक तो व्हिडिअो पाहून गुणांकन ठरवतो. यासोबतच प्ले ग्रुप व नर्सरीच्या मुलांसाठी“मनोरंजनातून शिक्षण’ हा उपक्रमही सुरू केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांनी ऑनलाइन शिक्षणावर भर द्यावा, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, दोन ते ६ वयोगटातील लहान मुलांना मोबाइल किंवा संगणकाद्वारे शिक्षण देणे धोक्याचे ठरू शकते. स्क्रीनकडे सातत्याने बघत राहिल्याने डोळ्यांना त्रास होऊ शकतो. यावर रोहित गिरी यांनी आगळावेगळा उपाय शोधला आहे.

कणकेपासून अल्फाबेट, बाराखडी, रांगोळीवर रेषा मारून एबीसीडी

कॉइनच्या नंबरनुसार बेरीज-वजाबाकी, कणकेपासून अल्फाबेट बनवणे, कणकेपासून बाराखडी तयार करणे, रांगोळीवर बोटांनी रेषा मारून त्यावर एबीसीडी लिहिणे, स्टीलचे ग्लास रचून त्याची मोजणी करणे आदी खेळांच्या व मनोरंजनाच्या माध्यमातून मुलांना शिक्षण दिले जाते.

मुलांसाठी उपयोगी पद्धत

मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया न घालवता पालक त्यांना घरीच मनोरंजनातून शिक्षण देऊ शकतात ही कल्पना सुचली आणि अमलात आणली. आतापर्यंत ४० पालकांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांची मुलेही त्यांच्याकडून शिक्षण घेत आहेत. - रोहित गिरी, शिक्षक

शिक्षणाची गोडी वाढली

ऑनलाइन शिक्षणाचा मुले कंटाळा करतात. त्यामुळे ऑफस्क्रीन पद्धतीने मुलांना शिक्षण देणे मुलांनाही आवडत आहे. मुलेही आनंदाने शिकत आहेत. छोट्या छोट्या गोष्टींमुळे मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली. - तृप्ती पोकर्णा, पालक

आधी पालकांना केले प्रशिक्षित : मुलांना कसे शिकवायचे, त्यांचा अभ्यास कसा घ्यायचा आदींबाबत ४० पालकांना तीन दिवस प्रशिक्षण देण्यात आले. मुलांना काय शिकवायचे हे एका वहीमध्ये लिहून पालकांना देतात. पालक घरच्या घरीच अभ्यास मुलांकडून करून घेत असताना त्याचा व्हिडिअोदेखील बनवतात. टेलिग्रामवर व्हिडिअो अपलोड करतात. त्यानंतर शिक्षक गुणांकन करतात.

बातम्या आणखी आहेत...