आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खुलेआम काळाबाजार:​​​​​​​शिवाजीनगरमध्ये व्यवहार; येवल्याच्या तरुणाने 50 हजारांत दलालांकडून घेतले 2 रेमडेसिविर

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता उपचार कसे करायचे ? डॉक्टरांचा सवाल

एकीकडे शेकडो रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्यासाठी भटकत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी खेटे घालत आहेत. दुसरीकडे या इंजेक्शनचा खुलेआम काळाबाजार सुरू आहे. २६ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास येवला (जि. नाशिक) येथून आलेल्या एका तरुणाने शिवाजीनगरजवळील चौकात दोन दलालांना ५० हजार रुपये दिले आणि त्यांच्याकडून दोन इंजेक्शन घेतले. ही घटना घडली तेव्हा दिव्य मराठी प्रतिनिधी साक्षीदार होता.

येवल्यातील एका खासगी रुग्णालयात एका तरुणाचे नातेवाईक कोरोनावर उपचार घेत आहेत. काल त्याला डॉक्टरांनी तत्काळ रेमडेसिविर आणण्यास सांगितले. मात्र, येवल्यात खूप शोधाशोध करूनही ते मिळाले नाही. पण तेथील एक औषधी विक्रेत्या दुकानदाराने त्यांना सांगितले की, औरंगाबादेत काही दलाल आहेत. ते तुला निश्चितपणे रेमडेसिविर देतील. पण त्यासाठी थोडे जास्त पैसे मोजावे लागतील आणि तुला स्वत:लाच औरंगाबादला जावे लागेल. तरुणाने वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवल्यावर दुकानदाराने दलालांचा मोबाइल नंबर दिला. त्यावर रविवारी त्याने दलालांशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी “काही काळजी करू नका. दोन इंजेक्शन नक्की मिळतील,’ असे उत्तर देऊन “आधी औरंगाबादला पोहोचा. आल्याचे कळवा. मग पुढील गोष्टी सांगू,’ असे म्हटले. त्यानुसार हा तरुण सोमवारी दुपारी शहरात आला होता.

राखाडी रंगाच्या अॅक्टिव्हावर आले दाेन दलाल
साेमवारी दुपारी चार वाजता येवल्याच्या तरुणाने दलालांशी संपर्क साधला. ‘मी कार घेऊन औरंगाबादला आलो आहे. तुम्हाला कुठे भेटता येईल’, असे विचारले. त्यावर दलालांनी “देवळाईजवळील चौकात या. पाच मिनिटांत आम्हीच पोहोचतो,’ असे सांगितले. ते कोणत्या वाहनावर येणार याचीही माहिती दिली. मोजून पाचव्या मिनिटांनी राखाडी रंगाच्या अॅक्टिव्हा दुचाकीवर २५ ते ३० वयोगटातील दोघे आले. त्यातील एक अंगाने जाडजूड होता तर दुसरा सडपातळ होता. तोंडाला मास्क होते. हे दलाल तरुणाच्या कारजवळ आले आणि खिशातून हेटरो कंपनीच्या रेमडेसिविरच्या दोन बाटल्या दिल्या.

त्या वेळी झालेला संवाद असा...
दलाल : सर, नीट बघून घ्या, एक्स्पायरी डेटसुद्धा पाहा.
तरुण : हो.. ओके आहे. वापरता येतील. धन्यवाद.
(तरुणाने गाडीत ठेवलेले ५० हजार रुपयांचे बंडल दुचाकी चालवणाऱ्या जाडजूड दलालाच्या हातात दिले.’
दलाल : ओके सर. (नोटा मोजण्यासाठी सोबतच्या दलालाकडे दिल्या.)
तरुण : सर, ५० हजार जरा जास्त झाले.
दलाल : अहो, साहेब खूप स्वस्तात मिळाले तु्म्हाला. कालच शहरात कारवाई झाली.
तरुण : हं... अजून दोन लागतील. मिळतील का? पण जरा कमी किमतीत पाहा ना.
दलाल : चालेल. पाहतो. उद्या माझ्याकडे आणखी काही इंजेक्शन येतील. मी तुम्हाला फोन करतो.
तरुण : ठीक आहे सर. पुन्हा एकदा धन्यवाद.
(दोन्ही दलाल दुचाकीवर शिवाजीनगरच्या दिशेने निघून गेले.)

मिनी घाटीतील चाेरीशी दलालांचे कनेक्शन ?
६ एप्रिल रोजी मिनी घाटीच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यासह शिवाजीनगर, सूतगिरणी चौकातील दाेन औषधी विक्रेत्यांना रेमडेसिविर काळाबाजारप्रकरणात अटक झाली होती. या तिघांचीही २० एप्रिल रोजी जामिनावर सुटका झाली आहे. शनिवारी मिनी घाटीतील ५ इंजेक्शनची चोरीची तक्रार दाखल झाली आहे. त्याचे या दलालांशी कनेक्शन असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. ते निर्धास्तपणे आले,

ते निर्धास्तपणे आले, बिनधास्तपणे गेले
येवल्याच्या तरुणाने संपर्क साधला. तेव्हा त्याला वाटले की, दलाल त्याला औरंगाबादेतील एखाद्या निर्जनस्थळी, अंधार पडल्यावर बोलावतील. तीन-चार वेळा भेटण्याचे ठिकाण बदलतील. पण प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. दलालांनी गजबजलेल्या चाैकात बोलावले. ते निर्धास्तपणे आले आणि नोटा मोजून बिनधास्तपणे निघूनही गेले. त्याचा ‘मनमोकळा’ व्यवहार पाहून येवल्याचा तरुणही आश्चर्यचकित झाला होता.

बातम्या आणखी आहेत...