आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिंडीतील आरोग्य कर्मचाऱ्यांना गाडी नाकारली:325 किलोमीटर प्रवास औषधांची गोणी डोक्यावर घेऊन जि.प. कर्मचाऱ्यांची अशीही वारी

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्ह्यातून वारीला जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी टँकरची सुविधा करण्यासाठी 22 लाखांची तरतुद औरंगाबाद जिल्हा परिषदेने केली आहे. मात्र, त्याच जिल्हा परिषदेने पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीचा 325 किलोमीटर प्रवास करण्यासाठी आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा परिषदेने आरोग्य पथक पाठविलेले असून, अधिकाऱ्यांना खासगी गाड्या देणाऱ्या प्रशासनाने आरोग्य सेवकांना मात्र गाडी नाकारल्याने, पथकातील आरोग्य सेवक औषधांची गोणी डोक्यावर घेऊन वारीसोबत पायी जात आहेत. प्रशासनरुपी विठ्ठल कोपल्यानेच त्यांच्यावर ही वेळ आल्याची चर्चा आता औरंगाबाद जि.प.मध्ये रंगली आहे.

दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने, हरिनामाचा जयघोष करत वारकरी हजारो किलीमीटरचे अंतर सहज पार करून जातात. विठ्ठल-रुख्माईची हातात मूर्ती, डोक्यावर तुळस घेऊन वारीत पायी चालणारे वारकरी सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या महामारीचे अनेक वाईट प्रसंगी नागरिकांनी अनुभवले आहे. दक्षता म्हणून या वारीत औषधांची गोणी डोक्यावर घेऊन चालणारे आरोग्य सेवकही लक्ष वेधत आहेत. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातून जाणाऱ्या दिंड्यांसाठी पिण्याचे पाणी पुरवठा करणारे टँकर आणि आरोग्य पथक पाठविले आहे.

वारकऱ्यांना आरोग्य सेवा

एका-एका दिंडीसोबत एक टँकर आणि एक आरोग्य सेवक व आरोग्य सहाय्यक देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यंदा टँकर आणि आरोग्य पथकासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली गेली नाही. त्यामुळे माजी बांधकाम सभापती विलास भुमरे यांनी वारीसोबत टँकर आणि आरोग्य पथक देण्याची मागणी केली. यानंतर टँकरसाठी 22 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. तर वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी पथक नेमून 20-25 जणांची नियुक्ती करण्यात आली. आरोग्य सेवकाकडे सर्दी, खोकला, ताप आदीं आजारांची औषधी, ओआरएस, मास्क आदी साहित्यही देण्यात आले. हे साहित्य टँकरमध्ये ठेवा, असे सांगत गाडी नाकरण्यात आली आहे. मात्र, वारीत गेल्यावर टँकरमध्ये वारकऱ्यांचे सामान पाहून आरोग्य सेवकांना औषधांची गोणी डोक्यावरुन वाहून न्यावी लागत आहे. ही औषधी घेऊन जाण्यासाठी त्यांना गाड्या देण्याच्या सूचनाही नियुक्ती आदेशात दिलेल्या आहेत. मात्र, त्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात विचारणा केली असता जि.प. अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही.