आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकन्नड तालुक्यातील कोळवाडी येथील गोविंदराव पाटील जिवरख वरिष्ठ महाविद्यालयाची संलग्नता काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ‘कॉलेजची फक्त पाटी, प्रत्यक्षात परीक्षा केंद्र २४ किमी दूरच्या शाळेत’ हे वृत्त ‘दिव्य मराठी’ने रविवारच्या अंकात प्रसिद्ध केलेे होते. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी तातडीने परीक्षा केंद्र रद्द करून तीनसदस्यीय समितीमार्फत येथील चौकशी सुरू केली होती. या समितीने सोमवारी येथे भेट दिली असता गावात फक्त एकच पाटी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही समिती बुधवारी त्यांचा अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर कॉलेजवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
या महाविद्यालयातील सदर गलथान कारभार दिव्य मराठीच्या प्रतिनिधीने प्रकाशात आणला होता. त्यावर कॉलेजच्या पायाभूत सुविधांच्या तपासणीसाठी कुलगुरूंनी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेत तीनसदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. या समितीत मानव्य व समाजिकशास्त्रे विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत अमृतकर आणि डॉ. दीपक पाचपट्टे यांचाही समावेश आहे. समितीने सोमवारी दुपारी ३.३० वाजता कोळवाडीच्या जिवरख कॉलेजची झाडाझडती घेतली. कॉलेजला फक्त पाटी लावलेली होती.
आतमध्ये प्रयोगशाळा, ग्रंथालय, खेळाचे मैदान, वर्गखोल्या, प्राचार्यांच्या केबिनसह इतर कुठल्याही पायाभूत सुविधांची वानवा असल्याचे समितीने पाहिले. समिती कॉलेजला पोहोचली त्या वेळी प्राचार्य विकास जिवरख छत्रपती संभाजीनगर शहरात होते. समितीचे सदस्य बुधवारी कुलगुरूंना अहवाल सादर करणार आहेत. कुलगुरू कॉलेजला त्यांची बाजू मांडण्याची संधी देतील. त्यानंतर कॉलेजची संलग्नता रद्द होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.