आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही दिवसांपासून सततच्या वृक्षतोडीमुळे शहराचे ऐतिहासिक वैभव आणि जैवविविधतेने परिपूर्ण असलेल्या हिमायतबागेची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे. या ठिकाणी रोज वृक्षांची कत्तल केली जात आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन हिमायतबागेतील वृक्ष, जैवविविधतेचे संरक्षण करावे; अन्यथा हिमायतबागेत आंदोलन करू, असा इशारा वरिष्ठ संशोधन सहायक विजय सावंत यांना मानद वन्यजीवरक्षक डॉ. किशोर पाठक यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या वेळी सावंत यांनी सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
चिंच, आंबा व इतर फळे उतरवताना झाडांच्या फाद्या तोडल्या जात आहेत. हिमायतबागेत उपद्रवी लोकांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हिमायतबागेला चारही बाजूनी अतिक्रमण करण्यात आले आहे. बागवान फळविक्रेते येथील अधिकारी असल्याचे सांगून फळविक्री करत आहेत. हे बागवान कुंपणासाठी झाडांची कत्तल करत आहेत. या भागातील विहिरींनाही संरक्षण नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
वृक्षतोड बंद करावी, चारही बाजूंनी संरक्षक भिंत बांधावी, झाडांना इजा होइल असे फलक, बॅनर लावू नये, बागवान फळविक्रेत्यांना फळविक्रीसाठी गेटजवळ जागा उपलब्ध करून द्यावी, बागवान ठेकेदारांवर अंकुश ठेवावा, तळीरामांचा बंदोबस्त करावा, मॉर्निंग वॉकसाठी वेळ निश्चित करावी, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करवा, अशी मागणी केली आहे. निवेदनावर डॉ. किशोर पाठक, प्रसाद जोशी, रफत कुरेशी, इतिहासतज्ज्ञ डॉ. दुलारी कुरेशी, मिलिंद गिरधारी, चंद्रशेखर बोर्डे, अॅड. स्वप्निल जोशी आदींची नावे आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.