आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांचा धाक नाही:मवाल्यांचा त्रास; तरुण-तरुणी असुरक्षित ; गेल्या काही दिवसांत आणखी तीन घटना, दोन प्रकरणात गुन्हाही दाखल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देवगिरी महाविद्यालयीन विद्यार्थिनी कशिशची एकतर्फी प्रेमातून हत्या, त्यापूर्वी दहा दिवसांत झालेल्या खुनाच्या सहा घटनांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. नशेखोरांचे प्रमाण वाढल्यामुळे लुटमारीच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. तसेच महाविद्यालय-कोचिंग क्लासेस परिसरातही टोळक्यांकडून तरुणांना मारहाण करून सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो व्हायरल केले जात आहेत. सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे तरुण-तरुणींसाठी असुरक्षित वातावरण निर्माण होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसांत अशाच एकापाठोपाठ घडलेल्या तीन घटनांमुळे पुन्हा एकदा असुरक्षिततेचे चित्र निर्माण झाले. यापैकी दोन घटनांत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, तर तिसऱ्या घटनेत अद्याप तक्रार दाखल झालेली नाही.

हडकोच्या उद्यानात बसलेल्या तरुणावर चाकूने हल्ला; मोबाइल पळवला

मूळ मंठ्याचा रहिवासी असलेला वैभव बांगर (२५) हा सध्या शिवाजीनगर राहतो. यशवंतराव चव्हाण आयुर्वेदिक महाविद्यालयात तो शिक्षण घेत आहे. २९ मे रोजी तो एका मैत्रिणीला भेटण्यासाठी टीव्ही सेंटर भागात गेला होता. स्वामी विवेकानंद उद्यानात ते रात्री नऊ वाजेपर्यंत गप्पा मारत बसले होते. या वेळी पाठीमागून २२ ते २८ वयोगटातील दोन तरुण तिथे आले. ‘तू कहा पे रहता है..’ असे म्हणत त्यांनी वैभवचा माेबाइल उचलला. वैभवने उठून त्यांना कारणे विचारत मोबाइल परत घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यापैकी एकाने थेट चाकू काढून वैभवच्या छातीवर उजव्या बाजूला वार केला. पुन्हा वार करण्याच्या तयारीत असतानाच वैभव तत्काळ प्रसंगावधान राखत मैत्रिणीला घेऊन उद्यानाच्या बाहेर आला व दुचाकीवर बसून रुग्णालयात गेला. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले व पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर वैभववर बीड बायपास येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याने सिडको पोलिसांना जबाब दिला. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

एकतर्फी प्रेमातून मैत्रिणीला धमकी, ‘देवगिरीसारखे’ करायला भाग पाडू नको कशिशच्या घटनेप्रमाणेच वाळूज परिसरात एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीला धमकावल्याचा प्रकार समोर आला. २० वर्षीय तरुणीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, तिच्यासोबत फार्मसी महाविद्यालयात असलेला रोहन गायकवाड व तिची काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. ती त्याला भाऊ मानत होती, मात्र रोहनने तिच्यावर एकतर्फी प्रेम सुरू केले. काही दिवसांनी त्याने तिला इतर मुलांसोबत बोलायचे नाही, असे धमकावणे सुरू केले. तिने हा प्रकार प्राचार्यांना सांगितला. त्यामुळे रागावलेल्या रोहनने तिला ‘मला देवगिरी महाविद्यालयात जसे घडले तसे करण्यासाठी भाग पाडू नको’ अशी तंबीच दिली. मुलीने हा प्रकार पुन्हा प्राचार्यांना सांगितला. त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून दामिनी पथकाला कळवले. तसेच मुलीच्या वडिलांनाही प्रकार कळवून कुटुंबाला ठाण्यात जाण्यास सांगितले.’ वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याच याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

मॉलमध्ये भावासोबत फिरणाऱ्या तरुणीची तिघांकडून छेडछाड शुक्रवारी शहरात एका मॉलमध्ये तरुणीचा तीन तरुणांनी पाठलाग करून नाव व सोशल मीडियाचा आयडी विचारत छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मुलीने सदर घटना सोशल मीडियावर व्यक्त केली. अज्ञात व्यक्तीने ती पोस्ट निनावी शेअर केली व पाहता पाहता दिवसभर तरुणाईंच्या ग्रुपमध्ये ती वाऱ्यासारखी व्हायरल झाली. इंग्रजीमधून लिहिलेल्या पोस्टमध्ये तरुणी म्हणते की, ‘मी माझ्या भावासोबत मॉलमध्ये दुपारी चार वाजता गेले होते. फिरत असताना अचानक तिघांनी माझा पाठलाग सुरू केला. सुरुवातीला गेम झोनमध्ये गेले. त्यानंतर फूड कोर्टमध्ये जाईपर्यंत पाठलाग केला. मला सोशल मीडियाचा आयडी विचारला. मी रागाने ओरडून त्यांना दूर जाण्यास सांगितले. मला या घटनेनंतर क्षणभर ‘कशिश’चीच आठवण आली. मी देशभरात फिरते, पण असा अनुभव आला नाही.’ अनेक मुलींनी तिची ही पोस्ट शेअर केली. मात्र अद्याप कुठेच तक्रार दाखल नसल्याने या पोस्टची सत्यता मात्र होऊ शकली नाही. मात्र, व्हायरल पोस्टचा स्क्रीनशॉट दिव्य मराठीकडे उपलब्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...