आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयएएस अधिकारी चिन्मय गोतकर हे सध्या नागपूर स्मार्ट सिटीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सन २००० मध्ये बारावीत त्यांच्याही पदरी अपयश पडले. मात्र, त्यातून खचून न जाता त्यांना दुसऱ्या विषय घेऊन पुन्हा परीक्षा दिली अन् उत्तीर्ण झाले. शिक्षणाची हीच जिद्द त्यांना आयएएसपर्यंत घेऊन गेली. हा जीवनानुभव त्यांच्याच शब्दांत ...
मोठा भाऊ यूपीएससीची तर मधला भाऊ इंजिनिअरिंगची तयारी करत होता. त्या वेळी म्हणजे २००० साली मी बारावीत होतो. निकाल लागेपर्यंत बिनधास्त होतो. पण, निकाल लागला आणि मी गणितात नापास झालो. दोन्ही हुशार भावंडांच्या मध्ये असलेला मी असा नापास झाल्याने नातेवाइकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अनेकांनी तर ‘याचं काही खरं नाही’, अशा आविर्भावात टिप्पण्या केल्या. पण, मी माझ्या नापास होण्याचं कारण शोधलं. मुळात मला गणित हा विषय आवडतच नव्हता. त्यामुळे गणित या विषयाऐवजी दुसरा इतिहास किंवा भूगोल विषय घेतला तर मी चांगल्या मार्कांनी पास होऊ शकतो, असा स्वत:चा आत्मविश्वास होता. आणि झालेही तसेच. पुढच्या प्रयत्नात मी भूगोल विषय निवडला, चांगला अभ्यास केला आणि विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालो.
२००२ साली मी नागपूरला सेकंड क्लासमध्ये बी.एस्सी. झालो. मार्कशीट घेऊन घरी आलो. तेव्हा आईने सांगितले, ‘मी एका ज्योतिष्याला तुझे भविष्य विचारले होते, त्याने तू ४० व्या वर्षी ग्रॅज्युएट होशील, असं सांगितलं.’ आईचं हे बोलणं ऐकूण मी चाट पडलो. पुढील शिक्षणासाठी मला मोठ्या संस्थांमध्ये जावंसं वाटू लागलं. २००५ मध्ये दिल्ली विद्यापीठात लॉसाठी अॅडमिशन घेतले. तिथंच यूपीएससीची तयारीही सुरू केली. लॉ आणि यूपीएससी, अशी दोन डगरींवरची कसरत सुरू होती. एकदा असं जाणवलं, की आपण दोन्ही करण्याच्या नादात एकाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दोन्हींपैकी एकच काहीतरी केलं पाहिजे. माझं मन यूपीएससीकडे अधिक वळलं होतं. मोठा भाऊ आयएएस झालेला. त्याचा सल्ला घेतला, आई-वडिलांना विचारलं. त्यांनीही ‘तुला ज्यात अधिक रस आहे, ते कर’, असं सांगितलं आणि मी पूर्णवेळ यूपीएससीच्या मागे लागलो. २००६ मध्ये यूपीएससीची प्रिलिम दिली, फेल झालो. पुन्हा दिली, तेव्हा प्रिलिम पास झालो. मात्र, मेन्सला नापास झालो. तिसऱ्या प्रयत्नात प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यूवर विजय मिळवला आणि देशात १३५ वी रँक मिळवून मी आयएएस झालो.
माझं मत एवढंच आहे की...
शैक्षणिक परीक्षा या जीवनातील अंतिम परीक्षा नाहीत. माझ्या अनुभवानुसार आपल्याला ज्या विषयात व ज्या क्षेत्रात रस आहे, तेच निवडा. पालकांनीही पाल्यांचा कल ओळखूनच त्यांना सल्ले दिले पाहिजेत. उगाच दुसऱ्यांशी तुलना करून, दुसऱ्यांकडे पाहून प्रेरित होऊन आपण आपला मार्ग निवडायचा नाही. आपल्याला आवडणारा मार्ग निवडा, त्या मार्गाने जाण्यासाठी प्रयत्न करा. शेवटी “Failure is pause, not an end' हे वाक्य ध्यानात ठेवा...
शब्दांकन : नामदेव खेडकर
चिन्मय गोतकर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.