आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस सज्ज:मुख्यमंत्र्यांच्या पहिल्याच दौऱ्यासाठी बाराशे पोलिस, 50 अधिकारी तैनात ; एमआयएमचा इशारा

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे रविवारी (३१ जुलै) औरंगाबादच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी दिवसभर तीन पोलिस उपायुक्तांसह जवळपास ५० अधिकारी व १२०० कर्मचारी बंदोबस्तावर राहतील. शिंदे जाणार असलेल्या प्रत्येक ठिकाण, मार्गावर शनिवारी बंदोबस्ताची तालीम करण्यात येणार आहे.

शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करून भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. त्यांच्या दौऱ्याआधी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बंड केलेल्यांना लवकरच उत्तर देऊ, असा इशारा दिला होता. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शनिवार व रविवारी क्रांती चौकात आंदोलन करण्याची परवानगी मागितली. तसेच शुक्रवारी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीदेखील मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विरोध करणाऱ्यांच्या हालचालीवर पोलिसांचे लक्ष असेल. अनेक मार्गांचा वापर, अनेक ठिकाणी थांबा: शिंदे रविवारी सायंकाळी आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, संदिपान भुमरे, अतुल सावे यांच्या कार्यालयांना भेटी देतील. याच मार्गांवर असलेल्या क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादनासाठी थांबणार आहेत. शिवाय गुरुद्वारालादेखील भेट देतील. या दौऱ्याच्या सर्व मार्गावर १२०० पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच आमदार सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या औरंगाबाद जिल्हा दौऱ्याची उत्सुकता वाढली आहे. शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता शिंदे यांच्या उपस्थितीत वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे शिवसैनिकांचा मेळावा होईल. शिंदे रविवारी सकाळी १० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात अतिवृष्टी, पीक-पाणी व विकासकामांचा आढावा घेणार आहेत.

आमचा संवादावर विश्वास, काहीही होणार नाही
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी आम्ही सज्ज असून तो शांततेत पार पडेल. विरोधकांना त्यांचा अधिकार असतो. परंतु मुख्यमंत्री हे संविधानिक पद आहे. त्यात कुठलाही अनुचित प्रकार, अवैध मार्गाने विरोध अपेक्षित नाही. आम्ही कोणालाही नोटिसा दिलेल्या नाहीत. आमचा संवादावर विश्वास आहे. कोणाचे काही म्हणणे असल्यास त्यांनी योग्य मार्गाने ते मांडावे. - डॉ. निखिल गुप्ता, पोलिस आयुक्त.

बातम्या आणखी आहेत...