आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाचा निकाल:रेल्वे गेटमनला मारहाण करणाऱ्या दोघांना 20 हजारांचा दंड; रक्कम फिर्यादीला देण्याचे आदेश

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

दारु पिण्‍यास व पत्‍ते खेळण्‍यास मनाई केल्याने रेल्वे गेटमनला बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी तब्बल नऊ वर्षांनी दोघा आरोपींना 20 हजार रुपये दंडाची शिक्षा प्रधान जिल्हा व सत्र न्‍यायाधीश वाय.जी. खोब्रागडे यांनी ठोठावली.

नुकसान भरपाईचा आदेश

विशेष म्हणजे आरोपींना ठोठावण्‍यात आलेला दंड नुकसान भरपाई म्हणुन फिर्यादीला देण्‍याचे देखील आदेशात नमुद करण्‍यात आले आहे. सोनेश चंद्रकांत बनसोडे आणि सुशील हरीभाऊ मनोरे अशी आरोपींची नावे आहेत.

काय आहे प्रकरण

प्रकरणात तत्कालीन रेल्वे गेटमन लक्ष्‍मण काशीनाथ धनेधर (51) यांनी तक्रार दिली होती. त्‍यानूसार,7 सप्‍टेबर 2013 रोजी फिर्यादी हे राहुल नगर येथील बनेवाडी गेट क्रं. 51 येथे कार्यरत होते. सायंकाळी साडेपाच वाजेच्‍या सुमारास गेट क्रं.51 च्‍या बाजुच्‍या सायडींग जवळी वरील दोघे आरोपी दारु पिण्‍याच्‍या आणि पत्ते खेळण्‍याच्‍या इराद्याने तेथे आले. फिर्यादीने त्‍यांना विरोध केला असता चिडलेल्या आरोपींपैकी सुशील मनोरे याने फिर्यादीचे दोन्‍ही हात पकडले. तर आरोपी सोनेश बनसोडे याने फिर्यादीच्‍या डोक्यात लोखंडी बकेट मारुन जखमी केले. ही माहिती फिर्यादीने तत्कालीन सहाय्यक स्टेशन मास्‍तर हुसेन यांना दिली. प्रकरणात औरंगाबाद लोहमार्ग पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

न्‍यायालयाने ठोठावली शिक्षा

प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्‍यात आल्यानंतर खटल्याच्‍या सुनावणीवेळी अतिरिक्त सराकरी अभियोक्ता सुनिलकुमार बर्वे यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्‍यात दोन जण फितुर झाले. तर फिर्यादी, वैद्यकिय अधिकारी आणि तत्कालीन सहायक स्‍टेशन मास्‍तर हुसेन यांचा जबाब महत्‍वाचा ठरला. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून भादंवी कलम 323 आणि कलम 353 अन्‍वये प्रत्‍येकी दहा हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपींनी दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्‍यांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्‍याचे न्‍यायालयाने आदेशात नमुद केले आहे. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणुन हवालदार अमोल शिरसाठ आणि जमादार डी.एस. कोलते यांनी काम पाहिले.