आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांचनवाडी खून प्रकरण:‘आज दो लोगों को टपका ही डाला’ असे खुलेआम सांगणारे दोन आरोपी अटकेत; दारूसाठी 400 रुपये न दिल्याने हल्ला

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खून करून गावात गेल्यानंतर आरोपींनी त्यांच्या मित्रांजवळ ‘आज दो लोगों को टपकाही डाला’ असे खुलेआम सांगितल्याने नक्षत्रवाडी परिसरात खून झाल्याची माहिती गुन्हे शाखेपर्यंत गेली आणि आरोपी पकडले गेले. महेश दिगंबर काकडे (१८, रा. नक्षत्र पार्क) याचा त्याच्या दोन मित्रांनी चारशे रुपयांसाठी डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली होती. त्याचे वडील दिगंबर काकडे यांच्या फिर्यादीवरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेने विकास राहाटवाड आणि संदीप ऊर्फ गुज्जर मुळेकर (दोघे रा. कांचनवाडी) यांना साेमवारी सकाळी अटक करत सातारा पोलिसांच्या हवाली केले.

महेश काकडे हा त्याच्या तीन मित्रांसोबत कांचनवाडीतील एका इमारतीत रविवार दुपारपासूनच दारू पीत बसला होता. दुपारी तीन वाजता आरोपी विकास आणि संदीपने महेशकडे अजून दारू आणण्यासाठी चारशे रुपयांची मागणी केली. महेशने पैसे देण्यास नकार देताच त्याची कॉलर पकडत डोके जमिनीवर आपटले. नंतर त्याच्या डोक्यात दगड मारल्याने तो बेशुद्ध पडला. या वेळी महेशचा मित्र राहुलदेखील त्या ठिकाणी उपस्थित होता. तो भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करत असल्याने आरोपींनी राहुलच्या डोक्यात वीट मारली. यामुळे राहुल बेशुद्ध पडला. नंतर आरोपी विकास आणि संदीपने पुन्हा मद्यप्राशन केले. महेश आणि राहुल दोघेही हालचाल करत नसल्याने ते मरण पावले असे समजून रात्री ९.३० वाजता गावात जाऊन त्यांनी ‘आज दो लोगों को टपका ही डाला’ असे खुलेआम सांगितले. यामुळे गावात चर्चेला सुरुवात झाली. पाच तासांनंतर राहुल शुद्धीवर आला. जवळच महेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून त्याचा थरकाप उडाला. महेश काहीच हालचाल करत नसल्याने त्याने ही बाब त्याच्या वडिलांना सांगितली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत महेशला घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

साेमवारी सकाळी अाराेपींना अटक केली. ही कारवाई गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त रवींद्र साळोखे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्ता शेळके, सहायक फौजदार नंदकुमार भंडारे, पोलिस अंमलदार किरण गावंडे, संजूसिंह राजपूत, धर्मराज गायकवाड आणि नितीन देशमुख यांच्या पथकाने केली.

बातम्या आणखी आहेत...