आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:अडीच तास हुल्लडबाजी, तणाव ;  आयुक्तालयासमोर जमाव, 5 वाजता निवळले वातावरण

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मांनी केलेल्या वादग्रस्त, आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात शुक्रवारी विविध मुस्लिम संघटना, पक्षांनी देश बंदची हाक दिली. त्यात विभागीय आयुक्त कार्यालयावर झालेल्या आंदोलनामध्ये अनपेक्षित हुल्लडबाजांनी प्रवेश केला आणि अडीच तास तणाव निर्माण झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर दंगा काबू पथकासह शहरातील सर्व पोलिस अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. खासदार इम्तियाज जलीलही सक्रिय झाले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वातावरण निवळले. तत्पूर्वी एमआयएमचे शहराध्यक्ष शारेक नक्षबंदी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने शर्मावर कठोर कारवाईच्या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्तांना दिले. गेल्या चार दिवसांपासून विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ विविध संघटना, पक्ष शर्माच्या वक्तव्याचा निषेध म्हणून आंदोलन करत आहेत. शुक्रवारी एमआयएम व इतर संघटनांनी आंदोलनाचा निर्णय जाहीर केला. दुपारी एक ते दीडच्या दरम्यान जामा मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. कोणत्याही परिस्थितीत गडबड होणार नाही. कोणीही घोषणाबाजी करणार नाही. आपल्याला फक्त निषेध नोंदवायचा आहे, अशी स्पष्ट सूचना करण्यात आली. त्यानंतर लोक आंदोलनात सहभागी होण्यासाठी शांतपणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे निघाले. सहायक आयुक्त अशोक थोरात, निरीक्षक अशोक गिरी, अशाेक भंडारी, प्रशांत पोतदार उपस्थित होते. जमाव आंदोलनस्थळी पोहोचला तेव्हाही सर्वकाही नियंत्रणात होते. मात्र, काही मिनिटांमध्ये ८० ते ९० दुचाकींवर ट्रिपल सीट आलेल्या २५०-२७० हुल्लडबाजांनी जमावात प्रवेश केला. यात अनेकजण अल्पवयीन होते. ‘शर्माला फाशी द्या,’ अशी मागणी करत छायाचित्राला चपला मारणे सुरू केले. अत्यंत आक्रमक होत रस्ता बंद केला. त्यामुळे पाहता पाहता वातावरण तापले. पोलिसांची तारांबळ उडाली लेबर कॉलनीकडील चेलीपुरा, पेट्रोल पंपाजवळील दिल्ली गेट तसेच जिल्हाधिकारी निवासस्थानाकडून अचानक तरुणांचा मोठा जमाव आंदोलनाच्या दिशेने निघाला. घोषणाबाजी तीव्र व्हायला लागली. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. काहीतरी मोठी गडबड होऊ शकते, असा संदेश मिळताच पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता घटनास्थळी दाखल झाले. बेगमपुरा, सिटी चौक पोलिस, दंगाकाबू पथक देखील दाखल झाले होते. मात्र, जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. मग खासदार इम्तियाज जलील सक्रिय झाले. त्यांनीही समजूत घालण्याचा बराच प्रयत्न केला.

पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला, कारचालक बचावला

‘तो’ नेता पोलिसांच्या नजरेत एका राजकीय पक्षाच्या नेत्यानेच या हुल्लडबाजांना आंदोलनात घुसवल्याचे पोलिस दलातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. एप्रिल महिन्यात रमजानच्या काळात दोन समाजांमध्ये तणाव वाढवण्याच्या दोन घटना शहरात घडल्या होत्या. त्या वेळीही हा नेता पोलिसांच्या नजरेत आला होता. शुक्रवारी त्याची विशेष नोंद घेण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

शहरात शांतता महत्त्वाची : इम्तियाज खासदार इम्तियाज यांनी जमावाला उद्देशून सांगितले की, आपण कारवाईच्या मागणीसाठी एकत्र आलो आहोत. त्यामुळे मूळ उद्देशापासून दूर जाता कामा नये. शहरात शांतता महत्त्वाची आहे. मोदींनी त्या दोन व्यक्तींवर कारवाई करावी. ती झाली नाही तर आपण पुन्हा रस्त्यावर उतरू.

कारवर दगड फेकला एक कारचालक दिल्ली गेटकडे निघाला. तेव्हा हुल्लडबाजांनी कारवर हल्ला करून दगड फेकला. मात्र, भंडारी व पोतदार यांनी पथकासह गर्दीत उडी घेतली. कारसमोरील गर्दी हटवली. कारचालक व त्यातील लहान मुलीला सुखरूप बाहेर काढले. ते पाहून जमावाने अधिक जोरात घोषणाबाजी सुरू केली.

नशेखोर तरुण घुसल्याचा आरोप : मूळ आंदोलनकर्ते बाजूला पडून हुल्लडबाजांमुळे परिस्थिती बिकट होईल, याचा अंदाज आल्याने गुप्ता यांनी सूत्रे हाती घेतली. तिन्ही बाजूंनी येत असलेला जमाव तेथेच अडवण्यासाठी शहरातील इतर अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. सर्व पोलिस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, खासदार इम्तियाज आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजांना अण्णा भाऊ साठे चौकाकडे नेले. तेथून हे हुल्लडबाज निघून गेले. त्यानंतर गुप्ता निघाले. रात्री उशिरापर्यंत महत्त्वाचे चौक, पुतळ्याजवळ बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान, काही नशेखोर तरुण आंदोलनात घुसल्याचा अारोप खा. इम्तियाज यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...