आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवैधरीत्या गांजाचा (कॅनबिस वनस्पती) साठा करून विक्री करणाऱ्या कुख्यात गुन्हेगारासह त्याच्या साथीदारावर पोलिसांनी कारवाई करत १ लाख २६ हजार रुपये किमतीचा १२ किलो गांजा, एक चाकू, तीन मोबाइल, एक दुचाकी असा एकूण २ लाख २१ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ऋषिकेश संतोष पालोदकर (२२), आबेद खालेद चाऊस (२०, दोघेही रा. इंदिरानगर, गारखेडा परिसर) अशी गांजा विक्रेत्यांची नावे असून त्यांना ताब्यात घेतल्याचे पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी सोमवारी सांगितले.
काबरानगर परिसरातील इंदिरानगरातील कुख्यात तडीपार गुन्हेगार ऋषिकेश व आबेद हे दोघेही गांजाचा साठा करून ताे विक्री करत असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर, उस्मानपुरा विभागाचे सहायक आयुक्त विशाल ढुमे, पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शेषराव खटाणे, उपनिरीक्षक गणेश माने, विठ्ठल घोडके, पोलिस अंमलदार बाळाराम चौरे, गणेश डोईफोडे, संतोष पारधे, अजय कांबळे, जालिंदर मांटे, कल्याण निकम, राजेश यदमळ, दीपक जाधव, महिला पोलिस अंमलदार अकोलकर आदींच्या पथकाने ऋषिकेशच्या काबरानगरातील घरावर छापा मारला. या वेळी पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १ लाख २६ हजार रुपये किमतीचा १२ किलो गांजा, एक चाकू, तीन मोबाइल, एक दुचाकी असा एकूण २ लाख २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
दोन वर्षांसाठी होता हद्दपार
ऋषिकेशवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्याला दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करत तो आबेदच्या मदतीने शहरात गांजाचा साठा करून विक्री करत असल्याचे तपासात समोर आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.