आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:हिंगोलीतील मोक्का प्रकरणातील  दोघांना उत्तरप्रदेशातून अटक, हिंगोली शहर पोलिसांची कामगिरी

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहर पोलिस ठाण्यांतर्गत मोक्का प्रकरणातील दोघांना हिंगोली शहर पोलिसांच्या पथकाने उत्तरप्रदेशातील पुरंदरपुर पोलिस ठाण्यातून शनिवारी ता. २० पहाटे ताब्यात घेतले आहे. भागवत बांगर व लक्ष्मण नागरे अशी या दोघांची नांवे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सहा जणांवर मागील महिन्यात मोक्का अंतर्गत हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र गुन्हा दाखल होताच पाच जण फरार झाले होते तर एकास पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी उर्वरीत पाच जणांचा शोध सुरु केला होता. त्यासाठी पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, उपनिरीक्षक नितीन केणेकर, जमादार शेख शकील, शेख मुजीब, दिलीप बांगर, असलम गारवे यांचे पथक स्थापन करून त्यांचा शोध सुरु केला होता.

दरम्यान, यापैकी दोघे जण उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्हयातील पुरंदरपुर पोलिस ठाण्यांतर्गत एका ठिकाणी राहात होते. त्यामुळे पोलिसांना त्यांचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. यामध्ये त्यांनी भागवत बांगर व लक्ष्मण नागरे (रा. हिंगोली) अशी नांवे सांगितल्यानंतर पुरंदरपुर पोलिसांनी हिंगोली पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने उत्तरप्रदेशात रवाना झाले. आज पहाटे पोलिसांच्या पथकाने भागवत बांगर व लक्ष्मण नागरे या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांना हिंगोलीत आणले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात उर्वरीत तिघांचा शोध सुरु असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...