आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:इसापूर धरणाचे दोन वक्र दरवाजे उघडले, 1374 क्युसेक पाण्याचा विसर्ग; धरणांमध्ये सध्या 98.15 टक्के पाणीसाठा

हिंगोली3 दिवसांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली, यवतमाळ व नांदेड जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या इसापूर धरणाचे दोन वक्र दरवाजे सोमवारी ता. १३ दुपारी साडेबारा वाजता वीस सेंटीमीटर उघडण्यात आले आहेत. या दरवाज्यातून १३७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. हिंगोली, यवतमाळ व नांदेड जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या इसापुर धरणाच्या पाणीसाठ्याकडे तीनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष असते. या धरणावरच कळमनुरी शहर व २५ गाव मोरवाडी, आठ गांव गाडीबोरी या प्रादेशिक योजनेचा पाणी पुरवठा देखील अवलंबून आहे. तसेच धरणाच्या परिसरातील गावांचा पाणीपुरवठा देखील या धरणावर अवलंबून आहे.

इसापुर धरणातील पाणी पैनगंगा प्रकल्प कार्यालया अंतर्गत कालव्याद्वारे सोडले जाते. कालव्याद्वारे १.१० लाख हेक्टर शेती सिंचनाखाली येते. मागील काही वर्षात या धरणांमध्ये पाण्याची तूट निर्माण झाली होती. त्यामुळे हिंगोली जवळील खरबी येथे कयाधू नदीवर बंधारा बांधून ते पाणी इसापुर धरणात सोडण्यात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र मागील तीन ते चार वर्षापासून धरणांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध होऊ लागले आहे. सध्या धरणांमध्ये ९८.१५ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करणे क्रमप्राप्त झाले होते. त्यानुसार आज दुपारी साडेबारा वाजता धरणाचे २ व १४ क्रमांकाचे दोन वक्र दरवाजे वीस सेंटीमीटर ने उघडण्यात आले आहेत.

या दरवाजातून सध्याच्या स्थितीत १३७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दरम्यान धरणांमध्ये मागील २४ तासात ५.९८ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे. तसेच ता. १ जून पासून आजपर्यंत ५५९.७५ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे. पुढील काळात धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन दरवाजे उघडणे व बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे उर्ध्व पेनगंगा प्रकल्प कार्यालय चे कार्यकारी अभियंता ए. बी. जगताप, उप अभियंता एच. एस. धुळगंडे यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...