आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुलाचे लग्न होत नसल्यामुळे त्रस्त असलेल्या कुटुंबाला शोधून दोन ते पाच लाखांत वधू विकणारे रॅकेट राज्यात सक्रिय झाले आहे. मराठवाडा, खान्देशासह गुजरातमध्ये या रॅकेटने वधू विक्री करत कुटुंबांना फसवले. जळगाव शहरातील दोन महिला हे रॅकेट चालवतात. या दोघींनी स्वत:च्याच भाचीचे सहा महिन्यांत सहा वेळा लग्न लावले. अमळनेर येथे त्यांचे बिंग फुटले अन् मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले. रॅकेट चालवणारी टोळी मात्र फरार आहे. पुढील तपासासाठी या मुलीला दौलताबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
आशा गणेश पाटील, लता बाबूराव पाटील, रिंकू पाटील आणि अंड्यावाला काकू (सर्व रा. पांडे चौक, जळगाव), बाबूराव रामा खिल्लारे (रा. हिंगोली) हे मिळून रॅकेट चालवतात, अशी माहिती अटक केलेल्या २० वर्षीय तरुणीने दिली. २६ मार्च रोजी दौलताबादजवळील मावसाळा गावातील एका कुटुंबाला फसवल्यानंतर सरिता (नाव बदललेले आहे) हिने दौलताबाद किल्ल्याजवळून नवऱ्याला गुंगारा देत पळ काढून अमळनेर गाठले. तेथे ६ एप्रिल रोजी दुसऱ्या एका मुलासोबत लग्न केले.
तोपर्यंत दौलताबादेतील प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सरिता आणि या रॅकेटमधील काही सदस्यांचे फोटो अमळनेर येथील मित्राने पाहिले. मित्रासोबत लग्न करणारी मुलगी तीच असल्याचा संशय आला. तपासणी केल्यानंतर सरिताने मावसाळा येथील तरुणाला फसवल्याचे स्पष्ट झाले. मग तरुणाच्या कुटुंबीयांनी सरिताला काही कळू न देता पोलिसांना बोलावले. पोलिस घरी येताच सरिता बिथरली. तिने रॅकेटमधील इतर सदस्यांना ही माहिती दिली. या रॅकेटने मुलाच्या कुटुंबाकडून घेतलेले २ लाख परत पाठवले आणि पोबारा केला. मात्र अमळनेरमध्ये गुन्हा दाखल झाला नाही. हा प्रकार दौलताबाद पोलिसांना कळताच त्यांनी १० एप्रिल रोजी सरिताला ताब्यात घेतले. उपनिरीक्षक दिलीप बचाटे यांचे पथक तपास करत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.