आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी विनयभंगाचा आरोप:दोन टवाळखोरांनी 16 वर्षीय विद्यार्थ्याला निर्मनुष्य ठिकाणी नेत पैसे-मोबाइल चोरला

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यावर मुलीला छेडल्याचा आरोप केला. त्यानंतर त्याला धमकावून निर्मनुष्य परिसरात नेत मारहाण करत पैसे व मोबाइल हिसकावून नेल्याचा प्रकार समोर आला. उस्मानपुरा पोलिसांनी पाच दिवस तपास करून यात दोन टवाळखोरांना अटक केली. सचिन विजय इंगळे (२३, रा. त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी), गौरव ऊर्फ अभी साखरे (१८, रा. बालाजीनगर) अशी त्यांची नावे आहेत.

मूळ जालना जिल्ह्यातील गोकुळवाडीतील १६ वर्षीय कृष्णा (नाव बदललेेले आहे) बारावीचे शिक्षण घेण्यासाठी नुकताच शहरात आला असून ताे खासगी वसतिगृहात राहतो. ताे नेहमीप्रमाणे ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता भाजीवाली बाई पुतळ्यापासून ट्यूशनसाठी निघाला होता. या वेळी दोन तरुणांनी त्याला रस्त्यात अडवून माझ्या बहिणीची काही पोरांनी छेड काढली आहे, त्यात तू आहेस ना? असे म्हणत भीती दाखवली. त्यानंतर खात्री करण्यासाठी तू आमच्यासोबत चल, असे म्हणून त्याला मोपेड दुचाकीवर बसवून गाडे चौकमार्गे छोटा मुरलीधरनगर परिसरात नेले. तेथे रेल्वे रुळाजवळ नेऊन धमकावत खिशातील मोबाइल काढून त्यातील सिमकार्ड परत दिले व पँटमधील ५०० रुपये रोख बळजबरीने हिसकावून पोबारा केला. कृष्णा शहरात नवीन असल्याने प्रचंड घाबरला हाेता. हा प्रकार कुटुंबाला कळाल्यानंतर त्याने उस्मानपुरा ठाण्यात तक्रार दिली.

मुले शिक्षणासाठी येण्यास घाबरतात : उस्मानपुरा परिसरात सुमारे ७० पेक्षा अधिक ट्यूशन्स आहेत. काही दिवसांपूर्वीच या परिसरात एका विद्यार्थ्याला तीन टवाळखोरांनी नाहक मारून गंभीर जखमी केले होते. छेडछाडीच्याही अनेक घटना घडतात. मात्र, एकही ट्यूशनचालक विद्यार्थ्यांची जबाबदारी घेत नाही किंवा त्याच्याशी संवाद साधत नाहीत. परिणामी, बाहेरून शहरात शिकण्यासाठी येण्यास मुले घाबरतात.

टवाळखाेरांविराेधात तक्रार द्यावी, पाेलिस संरक्षण देतील याप्रकरणी निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक विनोद आबुज यांनी काही खबऱ्यांच्या मदतीने लुटारूंचा शोध सुरू केला. कृष्णाने सांगितलेल्या वर्णनात रंगवलेल्या केसांच्या मुद्द्यांवरून काहींना ताब्यात घेतले असता त्यात सचिन, गौरव असल्याचे निष्पन्न झाले. कृष्णाने तक्रार देण्याची हिंमत केल्याने दोघेही पहिल्यांदा पोलिसांच्या रेकॉर्डवर आले. यापूर्वीही ट्यूशन्सचालकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षा, योग्य समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु तरीही टवाळखोरांविरोधात कोणी तक्रार देत नाही. ट्यूशन्सचालकांनी विद्यार्थ्यांशी समन्वय साधावा. तक्रारीसाठी पुढे यावे, पोलिस विद्यार्थ्यांना संरक्षण देतील, असे आवाहन बागवडे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...