आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीसगाव:कन्नड घाटातून दुचाकी व कार वाहतूक आजपासून सुरू, अवजड वाहनांवर बंदीच

चाळीसगाव5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने कन्नड घाटातील वाहतूक गेल्या १५ दिवसांपासून बंद आहे. या घाटात दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून बुधवार, १५ सप्टेंबरपासून दुचाकी व कार अशा हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. मात्र अवजड वाहतुकीला बंदी असेल. त्यासाठी अजून एक ते दीड महिना प्रतीक्षा करावी लागेल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना सांगितले.

३० ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कन्नड घाटात ८ ठिकाणी दरड कोसळल्याने ३१ ऑगस्टपासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवून घाटात दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. आतापर्यंत साडेपाच मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यावरून लहान वाहने प्रवास करू शकतात, मोठ्या वाहनांची रुंदी अधिक असल्याने ही वाहतूक बंदच राहणार आहे.

ठिकठिकाणी संरक्षण भिंत : घाटाचे सर्वाधिक नुकसान पीरबाबा दर्ग्यापासून ते थेट वरच्या घाटापर्यंत झाले आहे. त्यामुळे थोड्या थोड्या अंतरावर संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम झाल्याशिवाय अवजड वाहतूक सुरू होणार नाही. बुधवारपासून दुचाकी व कार, रुग्णवाहिका अशा हलक्या वाहनांची ये-जा सुरू होणार आहे, असे संत सतरामदास इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक राज पुंशी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...