आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूजमधील 400 शेतकऱ्यांना दिलासा:जमिनींवर टाकलेले आरक्षण उठवणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधानपरिषदेत घोषणा

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज , जोगेश्वरी, रामराई येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर लादलेले आरक्षण पुढील अधिवेशनापूर्वी स्थगित केले जाईल अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज (दि.9) विधान परिषदेत केली. यासंदर्भात आ.सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. या भागातील साधारण ४०० शेतकऱ्यांना या घोषणेमुळे दिलासा मिळणार आहे.

वाळुज सिडको महानगर-3 करिता सिडको प्रशासनाने वाळुज, जोगेश्वरी, रामराई येथील शेतकर्‍यांच्या जमिनीवर टाकलेले आरक्षण पुढील अधिवेशनापूर्वी थांबवण्याची घोषणा करण्यात आली.वाळुज सिडको महानगर-3 करिता सिडको प्रशासनाने वाळुज, जोगेश्वरी, रामराई येथील जवळपास 400 शेतकर्‍यांच्या 1250 एकर जमिनीवर सन 1989 मध्ये आरक्षण टाकले होते. मात्र मागील 34 वर्षात सिडको प्रशासनाने या नियोजित प्रकल्पाचा विकास करण्यासाठी काहीच कार्यवाही केली नाही.

आजच निर्णय घेण्याची मागणी

सिडकाेने 18 फेब्रुवारी 2019 रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय घेऊन वाळुज महानगर प्रकल्प-3 हे सिडको अधिसूचित क्षेत्रातून वगळण्यासाठी ठराव केला होता. हा ठराव शासन मान्यतेअभावी प्रलंबित असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहाचे निदर्शनास आणून दिले. बाधित शेतकर्‍यांची मागणी लक्षात घेता याठिकाणची जमिन डीनोटीफाईड करणार का?, किंवा सदरील जमिन शासन संपादित करणार का? असे प्रश्न उपस्थित करून यासंदर्भात आजच निर्णय जाहीर करावा अशी आग्रही मागणी आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहात केली.

शेतकऱ्यांना दिलासा

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या लक्षवेधीवर उत्तर देताना सदरील जमिन पुढच्या अधिवेशनापर्यंत स्थगित केल्या जातील अशी घोषणा सभागृहात केली. या निर्णयामुळे वाळूज, जोगेश्वरी, रामराई गावातील शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते ना.अंबादास दानवे यांनी देखील या चर्चेत सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...