आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजून महिनाअखेरच्या सत्तांतरात शिवसेनेत सर्वाधिक बंडखोरी औरंगाबाद जिल्ह्यात झाली. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात काय चित्र दिसते, याकडे सर्वांची नजर लागली होती. निकाल जाहीर होताच शिंदेसेना (बाळासाहेबांची शिवसेना) आणि उद्धव सेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात खेचाखेची सुरू झाली आहे. जिल्ह्यातील २१६ पैकी ७६ ग्रामपंचायतींवर आमचा कब्जा झाल्याचा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. तर शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ म्हणाले की, त्यांनी उगाच फेकू नये. त्यांना फक्त ३२ ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. आमचा झेंडा जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ६५ ठिकाणी लागला आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार, रोहयोमंत्री संदिपान भुमरे, आमदार रमेश बोरनारे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. त्यांनी सर्व शक्ती पणाला लावून जिल्ह्यातील २१६ पैकी ६५ मध्ये सर्वाधिक ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे, असे त्यांचे समर्थक सांगत आहेत. त्याखालोखाल भाजपला ५५ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला १४, राष्ट्रवादीला १० ठिकाणी यश मिळाले. २२ जागांवर नेमका कुणाचा सरपंच झाला, याविषयी स्पष्टता झालेली नाही. दरम्यान, खोके-खोके असे ओरडणाऱ्यांच्या तोंडावर जनतेने या निकालातून जोडा मारला आहे, असे आमदार संजय शिरसाट म्हणाले. जनतेची कामे करणाऱ्यांनाच लोक स्वीकारतात, हेही स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. आमदार दानवे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी शक्तीचा प्रचंड गैरवापर करूनही लोकांनी उद्धवसेनेच्या पदरात मोठे माप टाकले आहे. आडूळ आणि बिडकीनची अत्यंत प्रतिष्ठेची ग्रामपंचायत आम्ही िजंकली. वैजापूर तालुक्यातील महालगावची ग्रामपंचायतही आमच्या ताब्यात आली आहे. खैरे म्हणाले की, महाविकास आघाडी मजबूतपणे उभी राहिली. बंडखोरांच्या ताब्यातील अनेक ग्रामपंचायती उद्धवसेनेने जिंकल्या आहेत. दरम्यान, राजकीय विश्लेषकांच्या मते कोणती ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात हे आताच खात्रीशीरपणे सांगता येणार नाही. त्यासाठी किमान चार-आठ दिवस वाट पाहावी लागेल. कारण अनेक सरपंच वाहते वारे पाहून एका पक्षातून दुसरीकडे उड्या मारत असतात.
रोहयोमंत्री संदिपान भुमरेंची कन्या राष्ट्रवादीकडून सरपंच
शिंदेसेना, राष्ट्रवादीमध्ये राजकीय वितुष्ट असले तरी रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांच्या कन्या प्रेरणा प्रतापसिंह पंडित राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आघाडीतून सरपंच झाल्या आहेत. दैठण (ता. गेवराई) येथे त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वातील पॅनलकडून निवडणूक लढवली. त्यांनी उद्धवसेनेच्या शुभांगी नीळकंठ पंडित यांचा पराभव केला. प्रेरणा या माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचे चुलतबंधू संभाजीराव पंडित यांच्या सूनबाई आहेत. दैठण हे माजी मंत्री बदामराव पंडित व राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे गाव आहे. ग्रामपंचायतीवर अनेक वर्षांपासून अमरसिंह पंडित गटाचे वर्चस्व आहे. प्रतापसिंह पंडित यांनीही दैठणचे सरपंचपद भूषवलेले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.