आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवात राजकीय प्रचार:उद्धव सेना भक्तांना देणार 50 हजार ढेपले-चटणी; शिंदेसेना गणेश प्रतिमा, भाजप स्मृतीचिन्ह

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
उद्धव सेनेतर्फे ५० हजार ढेपले-चटणी बनवण्याचे काम गुरुवारी सुरू झाले. - Divya Marathi
उद्धव सेनेतर्फे ५० हजार ढेपले-चटणी बनवण्याचे काम गुरुवारी सुरू झाले.

गणेश विसर्जन मिरवणुकीत औरंगाबादमध्ये दरवर्षी शिवसेना, भाजप, मनसेतर्फे मंच उभारले जातात. तेथे मिरवणुकीत सहभागी गणेश मंडळांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, अधिकाऱ्यांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार केला जातो. यंदा त्यात शिंदेगटाची भर पडली आहे. उद्धव सेनेतर्फे ५० हजार भक्तांना ढेपले, चटणी दिली जाणार असून शिंदे सेनेतर्फे गणेश प्रतिमा दिली जाणार आहे. भाजपकडून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्मृतीचिन्ह दिले जाईल. मनसे नेहमीप्रमाणे यंदाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करणार आहे.

महाराष्ट्रातील सत्तांतर, उद्धव सेना - शिंदेसेनेतील वाढलेले वाद आणि आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता विसर्जनाच्या पूर्वसंध्येला राजकीय तणाव होईल, अशी चर्चा होती. राजाबाजार ते शहागंज, सिटी चौक, गुलमंडी, औरंगपुरा, जिल्हा परिषद मैदान या मुख्य मिरवणूक मार्गावर तसेच चिकलठाणा, मुकुंदवाडी, गारखेडा येथे राजकीय पदाधिकारी मंच उभारणीसाठी एकमेकांच्या जागा बळकावण्याचा प्रयत्न करतील, असेही म्हटले जात होते. प्रत्यक्षात तसे काही घडलेले नाही. उद्धव सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, शिंदे सेनेवर आम्ही हल्ला करावा, एवढेही कार्यकर्ते त्यांच्याकडे नाहीत. तर शिंदेगटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ म्हणाले की, आमचा मंच फक्त शिवाजीनगरालाच राहणार आहे. त्यामुळे उद्धव सेनेशी वाद होण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत. पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार राजकीय पक्षांचे ११ मंच एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर असतील. पोलिस बंदोबस्तामुळे सर्वकाही शांततेत होईल.

सकाळी ११ ते रात्री १२ पर्यंत :

उद्धव सेनेचे महानगरप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी सांगितले की, आम्ही ५० हजार भाविकांना सकाळी ११ ते रात्री १२ वाजेपर्यंत ढेपले आणि चटणी देणार आहोत. त्यासाठीची जोरदार तयारी केली आहे. गेल्या सात वर्षांपासून पुरीभाजीचा उपक्रम राबवत आहोत. सकाळी केलेली भाजी दुपारी खराब होते, असा अनुभव आहे. म्हणून यंदा ढेपले, चटणीचा बेत आखला आहे. भाजप शहरप्रमुख संजय केनेकर यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे स्मृतीचिन्ह देण्याचे आम्ही ठरवले आहे. शिंदे गटाकडून एकनाथ शिंदेचा फोटो असलेली गणेशाची प्रतिमा भेट दिली जाईल.

शाल, श्रीफळ देणार
मनसेचे शहर जिल्हाप्रमुख सुमित खांबेकर म्हणाले की, औरंगपुऱ्यात १५ वर्षांपासून आमच्या मंचाची जागा निश्चित आहे. ती भाजप, शिंदेगटाने मागितली होती. पण आम्ही त्यास नम्रपणे नकार िदला. शुक्रवारी आमच्याकडून शाल, श्रीफळ देऊन गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांचा सत्कार होणार आहे.उद्धव सेनेतर्फे ५० हजार ढेपले-चटणी बनवण्याचे काम गुरुवारी सुरू झाले. ते शुक्रवार सकाळपर्यंत चालेल.

उद्धव सेनेचे मुस्लिम पदाधिकारी

फुलांच्या पाकळ्या उधळणार
हिंदुत्व कायम राखत मुस्लिम बंधुभावाचा ठळक संदेश देण्यासाठी उद्धव सेनेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी सिल्लेखाना येथे विसर्जन मिरवणुकीचे स्वागत फुलांच्या पाकळ्या उधळून करावे, असे ठरले. अर्ध्या तासाच्या बैठकीनंतर ही भूमिका मुस्लिम पदाधिकाऱ्यांना पटली. त्यांनी ताातडीने हा उपक्रम यशस्वी करण्याची तयारी सुरू केली, असे महानगरप्रमुख तनवाणी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...