आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंभाजीनगर असे बनवणार की नामकरण करण्यात आदर्श आणि अभिमान वाटला पाहिजे, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ते शिवसेनेच्या बहुचर्चित औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर आणि भाजपच्या वाचाळ प्रवक्त्यांचा जोरदार समाचार घेतला.
संभाजीनगरवर काय म्हणाले?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, संभाजीनगर कधी करणार? संभाजीनगर कधी करणार? असे भाजप ओरडतेय, पण संभाजीनगर हे वडिलांनी दिलेले वचन आहे, ते मी विसरलो नाही. विसरणारही नाही. मला जे ओरडत आहेत, त्यांना आधी सांगायचे आहे की, जवळपास दीड वर्षापूर्वी औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलावा असा ठराव केंद्राकडे दिला आहे, त्याचे काय झाले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारला. शिवाय आम्ही संभाजीनगर असे बनवू की छत्रपती संभाजी महाराजांनाही आदर्श आणि अभिमान वाटला पाहिजे. नाव बदलून जर नागरीकांना पाणीच मिळत नसेल, खड्ड्यांचे रस्ते दिले तर संभाजी महाराजही मला रायगडावर टकमक टोक दाखवतील, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
कार्टी वाह्यात झाली...
ठाकरे म्हणाले की, आज तुम्हाला जाहीर विचारतो. ज्या भाजपच्या टिनपाट प्रवक्त्याने देशावर नामुष्की ओढावली हे तुम्हाला मान्य आहे का, आपल्या पंतप्रधानांचा फोटो कचराकुंडीवर लावला हे तुम्हाला मान्य आहे का? भाजपने गुन्हा करायचा आणि देशाने माफी मागायची असे म्हणत भाजपवर त्यांनी घणाघात केला. मी संघाबदद्ल यापूर्वीही बोललो होतो, भाजपने मध्येच सभा घेतली. सभेत सगळ्यांनी भगव्या टोप्या घातल्या होत्या. भगवी टोपी घातली म्हणून कोणी हिंदू होत नाही. भगव्या टोपीत हिंदुत्व असेल, तर संघ काळी टोपी का घालते. त्यांनी पाहावे त्यांची कार्टी किती वाह्यात झाली, ते पाहावी. मोहन भागवतांनी चांगली भूमिका घेतली. प्रत्येक मशिदीखाली शिवलिंग शोधायची गरज नाही. सध्या आपण नाजुक परिस्थितीतून जात आहोत. कोरोनाने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पण आता राज्यात गुंतवणूकदार येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मर्द असाल तर...
उद्धव ठाकरे म्हणाले की, हिंदुत्वाचे धडे आम्ही तुमच्याएवढे देणारे आम्ही छोटे नाही. काश्मिरी पंडितांनी घर सोडले, त्यांचा गुन्हा काय. घरात जाऊन गोळ्या घालतात, शाळेत जाऊन गोळ्या घालतात. मात्र, कोणालाही चिंता नाहीत. हिंमत असेल, तर काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालिसा पढा. मर्द असाल, तर कश्मिरी पंडितांची रक्षा करा. मी उद्धव ठाकरे शून्य आहे म्हणे. बाळासाहेब ठाकरे आहे म्हणून माझे नाव आहे. पण ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्व शिकवले त्याच्यावर आंदोलन सुरू झाले. बाळासाहेब म्हणत मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
आमचा संयम सुटला तर...
उद्धव ठाकरे म्हणाले की, कोर्टातून आदेश आला म्हणून राम मंदिर झाले. तुमचे कर्तृत्व काय. मधल्या सभेत मी बोललो. हिंदुत्व म्हणजे नेमके काय...आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आज जे घडते आणि झालेले आहे, भाजपने त्यांचे बेलगाम सुटलेल्या प्रवक्त्यांच्या डोक्यात अक्कल घातले पाहिजे. कदाचित उद्या आमचा संयम सुटला, तर तुमच्याच शब्दांत आमचे नेते टीका केल्याशिवाय राहणार नाहीत. हा जो भगवा आहे, तो नुसता फडकावण्यासाठी नाही. वारकऱ्यांचा भगवा आहे. छत्रपतींचा भगवा आहे. ते विचार आणि संस्कार आमच्या धमण्यात भिणणार नसतील, तर उपयोग नाही. इकडे हनुमान चालिसा म्हणायची आणि दुसरीकडे शिव्या देणे हिंदुत्व नाही.
राणेंनाही सोडले नाही...
औरंगाबादचे पालक मंत्री पालकमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले की, शिवसेनेने शिवसेनेच्याच सभेचे विक्रम आज मोडले. अशा विक्रमादित्य उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन ऐकवण्यास तुम्ही आलात. बाळासाहेबांवर जसे तुम्ही प्रेम केले, तसेच प्रेम तुम्ही आज उद्धव साहेबांवर करत आहात. तुमचे हेच प्रेम आमची ऊर्जा आहे. गेल्या अडीच वर्षांत उद्धव ठाकरेंनी एक आराखडा तयार केला.
औरंगाबादच्या ऋणातून उतराई...
सुभाष देसाई म्हणाले, औरंगाबादच्या ऋणातून उतराई होण्यासाठी काही शब्द दिले. ते पूर्ण केले. ७९२ कोटींचे रस्ते, १७४ कोटी जंगल सफारी, घनकचऱ्याचे चारही प्रकल्प केले. कमान कंट्रोलने शहर स्वच्छ करण्याचे काम सुरू केले. छत्रपती शिवरायांचा क्रांतीचौकातील पुतळ्याचे अनावरण झाले. तो क्षण एक प्रकारे पृथ्वीवर स्वर्ग अवतरलाय, अशी रोषणाई आणि जल्लोष सर्वांनी पाहिला. मात्र, ऑनलाइनच्या माध्यमातून एक विक्रम असा झाला की, दोन कोटी लोकांनी तो देव दुर्लभ सोहळा अनुभवला.
दोन वर्षांत शुद्ध पाणी...
सुभाष देसाई म्हणाले की, औरंगाबाद जिल्ह्याची पाणी टंचाई आता कमी झाली. भूजल पातळी वाढली आहे. तज्ज्ञांनी तसा अहवाल दिला आहे. शहराचा पाण्याचा तुटवडा नाहीसा व्हावा म्हणून १६८० कोटी रुपयांची योजना सुरू झाली. या योजनेतील दरवाढीचा अडथळ्याचा प्रश्न सोडवला. हे काम सुरू करताना कंत्राटदाराला काम मंदावल्यास तुरुंगात टाकण्याची तंबी दिली. तेव्हा त्याने पुढच्या दोन वर्षांत जायकवाडी ते औरंगाबाद शुद्ध पाणी आणून देण्याचे काम करेल, असे सांगितले. ते पुढे म्हणाले, अरे राणेंना ज्यांनी सोडले नाही, तेव्हा कोण हा ठेकेदार. तो काम रखडवू शकत नाही.
काही लोक खोटे बोलतायत...
माजी मंत्री अर्जुन खोतकर म्हणाले की, राज्यात हनुमान चालिसा म्हणू देत नाहीत असा खोटा प्रचार सध्या सुरू आहे. अनेक जण रोज हनुमान चालिसा म्हणतात. मात्र, हनुमान चालिसा कधी म्हणावी कधी नाही या साठी काही नियम आहेत. खोट्या आरोपाचे सत्र टिनपाट भाजपच्या नेत्यांकडून सुरू आहे. ते सुसंस्कृत महाराष्ट्र कोणत्या स्तरावर नेत आहेत, हे राज्याला कळून चुकले आहे. सध्या सूडाचे राजकारण सध्या सुरू आहे. भाजपचे हिंदुत्व बेगडी आहे. मी रोज दोनदा सकाळी हनुमान चालिसा वाचतो. मात्र, राज्यात त्यावरून वातावरण त्यावरून खराब करत आहेत. विकासाच्या नावावर काहीच बोलले जात नाही, अशी टीका त्यांनी केली.
पेडणेकरांचे केंद्राकडे बोट
औरंगाबाद शहराच्या नामांतर प्रश्नावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, नामांतरांचा मनपाने राज्य शासनाकडे पाठवावा लागतो आणि त्यानंतर हा मुद्दा केंद्रकडे जातो आणि मग मान्यता मिळू शकते.
सत्तारांचा दानवेंवर निशाना...
राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, औरंगाबादमध्ये सर्वांत जास्त विकास निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गेल्या अडीच वर्षांत दिला. मात्र, विरोधक केवळ त्यांच्यावर टीका करतात हे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय जालना लोकसभेला अर्जुन खोतकर यांना तिकीट द्यावे. आम्ही रावसाहेब दानवेंचा राजकीय वध करू, असा विश्वास शिवसैनिकांना देतो असे म्हणत भाजपला चिमटा काढला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.